दीपक भातुसे, प्रतिनिधी, झी मीडिया : राज्यात विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसात राज्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या दौऱ्यावर असून हा दौरा संपल्यानंतर २० सप्टेंबरनंतर केव्हाही राज्यातील निवडणुकीची तारीख जाहीर होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथकही राज्याच्या दौऱ्यावर असून आज मुंबईत विविध घटकांशी निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींची दिवसभर बैठकही आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींबरोबर बैठक घेऊन निवडणूक आयोग राज्यातील निवडणुकीची तयारी आणि कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीचा आढावा घेत आहे. यात राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे विविध मागण्या केल्या आहेत.


२० सप्टेंबरनंतर केव्हाही केंद्रीय निवडणूक आयोग दिल्लीत राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करू शकते. २५ ऑक्टोबरपासून दिवाळी असल्याने त्याआधीच राज्यात मतदान आणि मतमोजणी पूर्ण होईल अशी शक्यता वर्तवण्यात आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीची तारीख १२ सप्टेंबर रोजीच जाहीर झाली होती. तर १५ ऑक्टोबर रोजी मतदान आणि १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी झाली होती. २०१४ च्या तुलनेत यावेळी एक आठवड्यापेक्षा जास्त काळ उलटून गेला तरी निवडणुकीची तारीख जाहीर झालेली नाही.