Cotton Farm: शेतकऱ्यांच्या घरात कापूस अजूनही शिल्लक असताना, सीसीआयने कापूस खरेदी बंद केलीये.त्यामुळे शेतक-यांचा कापूस, विक्री अभावी पडून राहिलाय.बाजारातही भाव मिळत नसल्याने शेतक-यांची आता आर्थिक कोंडी होतीये. यंदा राज्यात सीसीआयच्या कापूस खरेदीत प्रचंड गोंधळ झाला.अनेकदा तांत्रिक कारण पुढे करत भारतीय कापूस महामंडळाकडून 15-15 दिवस कापूस खरेदी बंद राहीली.त्यातच आता अचानकपणे सीसीआयने शनिवारी कापूस खरेदी गुंडाळली.त्यामुळे शेतक-यांना डोक्यावर हात मारण्याची वेळ आली.
दरम्यान सीसीआयने खरेदी बंद केल्यानंतर विधानसभेतही हा मुद्दा गाजला.रोहित पवार यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला.तर यंदा कापसाचं चांगलं उत्पादन झालंय,त्यामुळे केंद्राने कापूस आयात करू नये यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं पणनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितल. सरकारने कापसासाठी भावांतर योजना लागू करावी सोबतच हमीभावापेक्षा कमी दराने कापसाची विक्री होते,त्यामुळं फरक रक्कम देण्याबाबत ठोस पाऊल उचलण्याची मागणी रोहित पवारांनी केलीये...
यंदा राज्यात सुमारे 40 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली. 40 लाख हेक्टर क्षेत्रातून 370 लाख क्विंटल कापसाचं उत्पादन झालं. सध्या सीसीआयकडून कापूस खरेदी बंद असून यंदाच्या हंगामात अनेकदा कापूस खरेदीत खंड पडला.सध्या 60 ते 70 लाख क्विंटल कापूस शेतक-यांच्या घरात शिल्लक आहे. खरेदी बंद झाल्याने कापसाचे दर हमीभावापेक्षा 500 रुपयांहून खाली उतरण्याची भीती आहे. दरम्यान सरकारने लवकरात लवकर कापूस खरेदी सुरू करावी, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली. यंदा बाजारात कापसाचे दर पडलेले आहेत. त्यामुळे शासकीय खरेदीवर शेतकऱ्यांची भिस्त होती. अजून बराच कापूस शिल्लक आहे. अशातच खरेदी बंद झाल्याने कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी होण्याची दाट शक्यता आहे. सीसीआयने अखेरच्या बोंडातील कापूस खरेदीचा दावा केला होता, तो मात्र आता फोल ठरलाय, असंच दिसतंय