CM Devendra Fadanvis: 2022 हे वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणातलं सर्जिकल स्ट्राइक होतं. आमचं सर्जिकल स्ट्राइक आता संपलंय, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. झी २४ तासच्या महाराष्ट्र गौरव कार्यक्रमात संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी सर्व प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.
राज ठाकरेंशी आम्ही नेहमीच चर्चा करतो. राज ठाकरे हे मुक्त विद्यापीठ आहे. त्यामुळे कोणाला डिग्री मिळेल नाही मिळेल हे सांगता येत नाही. लोकसभेत ते आमच्यासोबत होते. विधानसभेत ते आमच्यासोबत होते की नव्हते ते माहिती नाही. पालिका निवडणुकीत काय होईल माहिती नाही. पालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. जास्त जागा लढाव्या हे सर्वांना वाटतं. त्यामुळे काय होईल सांगता येत नाही, असे ते यावेळी म्हणाले.
शंकर, एहसान, लॉय यांच्याप्रमाणे आमचंही त्रिकूट आहे. आमच्याकडेही कोणीतरी शास्त्रीय संगीत आळवत, गिटार वाजवत. कोणीतरी वेगळा सूर आळवत पण आमची स्टाइल तशीच आहे. यात ड्रमर कोण आहे, हे कधीच कोणाला कळणार नाही, असे मिश्किलपणे मुख्यमंत्री म्हणाले.
मला राग तेव्हाच येतो जेव्हा मला भूक लागलेली असते. तेव्हा मी चिडचिड करतो. कोणत्याही परिस्थितीचा मी सामना करु शकतो. मला राग आलाय समजलं की खायला आणून द्या. ५ मिनिटांत माझा राग निघून जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आम्ही १०० दिवसांचा कार्यक्रम दिला होता. ज्यात स्वच्छता, नामफलक लावायचं होतं प्रलंबित कामे पूर्ण करायची होती. सर्व कार्यालयांनी अतिशय योग्य रितीने हे काम पार पाडलं. एकूण ९०० सुधारणा करायच्या होत्या. त्यातील ७६८ म्हणजे ८० टक्के कामे आम्ही केली. यासाठी एक संस्था नेमून त्याचे मुल्यमापन केले. एखादा अपवाद वगळता सर्वजण त्यात पास झाले. याचा पुरस्कार म्हणून मी आता १५० जणांचा कार्यक्रम मी त्यांना दिला असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सरकार म्हणून जे उपकरण आहे ते संस्था म्हणून तयार व्हायला हवी. सरकारच्या कामासाठी नागरिकाला कार्यालयात जायची गरज लागू नये. सर्व कामे मोबाईलवर होतील. यातील ६० टक्के काम आम्ही केलंय. आता ४०टक्के काम राहिलं असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
तिन्ही पक्षाच्या खात्यांनी चांगले काम केलंय. तीन लोकाचं सरकार नॅचरल डिलीव्हर होऊ शकत नाही. जिथे एकमत होत नाही ते आम्ही स्थगित ठेवतो. तोडगा कसा काढायचा हे सांगता आलं असतं तर तोडगा काढूनच आलो असतो. तोडगा निघेल असं महिनाभरापूर्वी सांगितलं होतं पण महिना कोणता असेल हे सांगितलं नव्हतं, अशी मिश्किल टिप्पणी मुख्यमंत्री फडणवीसांनी केले.
एकनाथ शिंदे शिवसैनिक आहेत. शिवसैनिक हे भावनिक असतात. त्यांच्याकडे संवेदनशिलता अधिक असते. अजितदादा राजकारणात अतिशय प्रॅक्टीकल आहेत. भावनेत न अडकता निर्णय घ्यायचा असं त्यांना वाटतं. दोघांसोबतही डील करणं सोपं जातं. म्हणूनच आम्ही शंकर एहसान लॉय आहोत, असे फडणवीस म्हणाले.
आम्ही मुंबई महायुती म्हणूनच लढणार. शंभर टक्के महायुती येईल आणि महायुतीचाच महापौर बसेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. युतीत यायचे नाही, उद्धव ठाकरेंनी ठरवलंच होतं. त्यामुळे युतीत सडलो वैगेरे ते म्हणत होते. कधीकधी कौतुकावरही सावरुन प्रतिक्रिया द्यावी लागते. उद्धव ठाकरे कधी कौतुक करतात कधी शिव्या देतात. एकत्र येण्याची अशी कोणतीही परिस्थीती आता दिसत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
झी २४ तासचा महाराष्ट्र गौरव कार्यक्रम दिमाखात पार पडला. या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील तरुणाईचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते दीप प्रज्वलनाने झाली. दिपाली विचारे आणि समूहाने गणेश वंदना सादर करुन सैनिकांना मानवंदना दिली. झी २४ तासचे संपादक कमलेश सुतार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.यानंतर ऑपरेशन सिंदूर- नारीशक्ती अंतर्गत मेजर प्राजक्ता देसाई, माजी लष्कर अधिकारी विंग कमांडर वैष्णवी टोकेकर, माजी एअर फोर्स अधिकारी कमांडर श्रद्धा जगताप यांची मुलाखत घेण्यात आली.
तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते वायूदूतच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी शंकर महादेवन यांची मुलाखत घेतली. कला संस्कृती विभागातील महाराष्ट्र रत्न पुरस्कार अभंग रिपोस्टच्या चमूला देण्यात आला. तसेच सामाजिक कार्यासाठी राजू केंद्र यांना सन्मानित करण्यात आले. सिनेमा विभागातून श्रीया पिळगावकरला महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अपशिंगे या सैनिकांच्या गावाला महाराष्ट्र रत्न पुरस्कार देण्यात आला. शंकर महादेवन यांना महाराष्ट्र गौरवने पुरस्कृत करण्यात आले. यानंतर अभंग रिपोस्टच्या सादरीकरण कार्यक्रमात रंगत आणली.