Maharashtra Government Cabinet Decisons: राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. यावेळी राज्य मंत्रिमंडळाने तीन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

Maharashtra Government Cabinet Decisons: राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आदिवासी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसंदर्भात या बैठकीत निर्णय घेतला आहे. याशिवाय सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातही शिक्षण आणि विद्यार्थ्य़ांच्या भवितव्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. सोलापुरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये या शैक्षणिक वर्षापासून (सन २०२६-२७) पदवीस्तराचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरु करण्यास मंजुरी मिळाली आहे. तर दुसरीकडे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासनास हस्तांतरित करण्याचं ठरलं आहे.
1) आदिवासी बांधवांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. स्वयंसेवी संस्थाच्या पाच प्राथमिक व १९ माध्यमिक अनुदानित आश्रमाशाळांची श्रेणीवाढ करण्यात आली आहे. प्राथमिकमधून माध्यमिक आणि माध्यमिकमधून कनिष्ठ महाविद्यालय अशी श्रेणीवाढ आहे, त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती व आवश्यक खर्चाच्या तरतूदीस मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे डोंगराळ, दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या मुलांचे शिक्षण गतीमान होणार आहे.
2) सोलापुरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये या शैक्षणिक वर्षापासून (सन २०२६-२७) पदवीस्तराचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सोलापूर आणि आजुबाजुच्या परिसरातील अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या होतकरूंच्या दृष्टीने हिताचा निर्णय. प्रत्येकी साठ प्रवेश क्षमतेचे एआय अँण्ड मशिन लर्निंग, कॉम्प्युटर सायन्स अँण्ड इंजिनियरींग, इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकम्युनिकेशन असे तीन नवे अभियांत्रिकी अभ्यासक्रम असणार आहेत.
3) धाराशिव जिल्हयातील तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या माध्यमातून चालविण्यात येणारे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासनास हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाविद्यालयाचे सक्षमीकरण होणार, अद्ययावत शैक्षणिक सोयी-सुविधांमुळे या परिसरातील होतकरूंना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण उपलब्ध होण्याची संधी उपलब्ध होणार आहे.