मुंबई : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहिम राबवली जात आहे. लसीकरण मोहिमेत महाराष्ट्रानं देशात विक्रमी घोडदौड कायम राखली आहे. राज्यात 3 कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्रानं देशातील अव्वल स्थान कायम राखलं आहे. देशात तीन कोटी लसीकरणाचा टप्पा गाठणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य असल्याची माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे.
महाराष्ट्राने लसीकरणात सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर लस वाया जाण्याचं प्रमाणही महाराष्ट्रात कमी आहे. राज्यातील लसीकरण मोहिमेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अभिनंदनही केलं आहे.
Maharashtra has become first state in India to administer three crore COVID-19 vaccine doses: Official
— Press Trust of India (@PTI_News) June 25, 2021
गुरुवारी 4 लाख 20 हजार 960 नागरिकांना लस देण्यात आली होती. यानंतर लस घेणाऱ्या नागरिकांचा आकडा 2 कोटी 97 लाख 23 हजारांवर पोहोचला होता. शुक्रवार दुपारी 2 वाजेपर्यंत राज्यात झालेल्या लसीकरणानंतर हा आकडा 3 कोटी 27 हजार 217 झाला. याआधी महाराष्ट्राने बुधवारी एकाच दिवशी 6 लाख 17 हजार नागरिकांना लस देण्याचा विक्रम केला होता.