महायुतीचा मास्टरप्लान! कशी होणार महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक?

Maharashtra Legislative Council: विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 5 जागांसाठी 27 मार्चला निवडणूक प्रक्रीया पार पडणार आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Mar 17, 2025, 08:57 PM IST
महायुतीचा मास्टरप्लान! कशी होणार महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक?
विधान परिषद निवडणूक

Maharashtra Legislative Council: विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 27 मार्च रोजी होणारी निवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जातेय. विधान परिषदेवरील आमदार विधान सभेला निवडून आल्यानंतर रिक्त झालेल्या पाच जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. महायुतीच्या तीनही पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केलीय.विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 5 जागांसाठी 27 मार्चला निवडणूक प्रक्रीया पार पडणार आहे. महायुतीकडून उमेदवारांची नावं निश्चित करून अर्जही भरण्यात आलेत.मात्र मविआच्या तीनही पक्षांनी या निवडणूकीत उमेदवार दिलेला नाहीय.याचं कारण म्हणजे विधान सभेत घटक पक्षांच्या आमदारांची संख्या कमी आहे.त्यामुळे उमेदवार दिला तरी मविआच्या उमेदवाराला यश मिळेल का याची शाश्वती नाहीय.त्यामुळे विरोधकांनी या निवडणुकीतून काहीशी माघार घेतल्याचं दिसतंय. त्यामुळे विधान परिषदेची ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.

विधानसभेतील सध्याचं संख्याबळ

भाजप - 132 
शिवसेना - 57
राष्ट्रवादी - 41
काँग्रेस - 16
शिवसेना UBT - 20
राष्ट्रवादी SP -  10

संख्याबळाच्या बाबतीत मविआ महायुतीच्या खूप मागे असल्याने मविआने उमेदवार देण्याचं धाडस केलेलं नाहीय. महायुतीचे विधान परिषदेचे उमेदवार कोण?

संजय केनेकर - भाजप
दादाराव केचे - भाजप
संदीप जोशी - भाजप
चंद्रकांत रघुवंशी - शिवसेना
संजय खोडके - राष्ट्रवादी काँग्रेस

यांना उमेदवारी दिली. खरं तर संजय खोडके हे स्पर्धेतलं नाव नव्हतं शिवाय सुलभा खोडके या विधानसभेत होत्या. पण झिशान सिद्दीकी, संग्राम कोते पाटील, आनंद परांजपे यांची आघाडीवरील नावं मागं पडली आणि संजय खोडकेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. महायुतीचे हे पाच उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात आहेत. विरोधकांनी उमेदवार न दिल्यामुळे या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जातोय.