...म्हणून वेगळा निर्णय घेतेय! ठाकरेंची सेना सोडून भाजपात जाताना तेजस्वी घोसाळकरांचा लेटर बॉम्ब

Maharashtra BMC Elections: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईमध्ये मोठा धक्का देण्यात भारतीय जनता पार्टीला यश आलं आहे. मात्र ठाकरेंची साथ देणाऱ्या या महिला नेत्याने अचानक भाजपामध्ये का जाण्याचा निर्णय का घेतलाय हे स्वत: स्पष्ट करत एक पत्र लिहिलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 15, 2025, 10:02 AM IST
...म्हणून वेगळा निर्णय घेतेय! ठाकरेंची सेना सोडून भाजपात जाताना तेजस्वी घोसाळकरांचा लेटर बॉम्ब
तेजस्वी घोसाळकरांचं पत्र चर्चेत

Maharashtra BMC Elections: मुंबई माहानगरपालिकेच्या निवडणुकीआधी शहरात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला भारतीय जनता पार्टीने मोठा धक्का दिला आहे. दहिसर-बोरिवलीमधील प्रभावशाली नेतृत्वांपैकी एक असलेल्या तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून त्या आज भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र शिवसेनेच्या ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते असलेल्या विनोद घोसाळकर यांची सून अचानक त्यांच्या पक्षाला का सोडतेय याचं कारण स्वत: तेजस्वी यांनी सांगितलं आहे.

Add Zee News as a Preferred Source

त्यांनी आज पक्षप्रवेश करण्याआधी सोशल मीडियावरुन आपल्या समर्थकांना उद्देशून एक पत्र लिहिलं असून त्यामधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'नाती बदलू शकतात, पण ऋणानुबंध नाहीत… वेदनेतून घेतलेला निर्णयही प्रामाणिकतेशी तडजोड करत नाही,' अशा कॅप्शनसहीत तेजस्वी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय. या पत्रात तेजस्वी काय म्हणाल्यात पाहूयात त्यांचं पत्र जसचं तसं...

प्रिय सहकारी शिवसैनिक बंधू-भगिनींनो,

आज आपल्याशी संवाद साधताना माझे मन प्रचंड उद्विग्न झाले आहे. आयुष्यात असा क्षण कधी येईल, आणि मला असे शब्द लिहावे लागतील, याची कल्पनाही मी कधी केली नव्हती.
आज मन जड आहे... शब्द अपुरे पडत आहेत... पण तरीही हा संवाद आवश्यक आहे.

मी, तेजस्वी अभिषेक घोसाळकर,

एक अत्यंत सामान्य कुटुंबातील मुलगी, घोसाळकरांसारख्या राजकीय आणि सामाजिक कुटुंबात सून म्हणून आले. समाजकारण, राजकारण हे माझ्यासाठी कधीही महत्त्वाकांक्षेचे साधन नव्हते. सासरे विनोद घोसाळकर आणि पती अभिषेक यांना साथ देण्यासाठीच मी या प्रवासात पाऊल टाकले. लोकांमध्ये राहणे, त्यांची कामे करणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, यातच मला खरा आनंद मिळत गेला. सगळं काही छान सुरू असताना, अभिषेक व मी आमच्या कुटुंबासाठी, आमच्या मुलांसाठी आणि दहिसर-बोरिवलीतील आमच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेसाठी अनेक स्वप्नं पाहत होतो.
पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. एका क्षणात आमच्यावर काळाचा घाला आला. अभिषेकची निघृण हत्या झाली.

शत्रूवरही अशी वेळ येऊ नये अशी वेळ आमच्यावर आली. त्या घटनेनं माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. दोन लहान लेकरं, मोडकळीस आलेलं मन, आणि तरीही आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या असंख्य लोकांची जबाबदारी, हे सगळं पेलताना मी अनेकदा कोसळले, पण पडू दिलं नाही. कारण त्या प्रत्येक क्षणी आपण सर्वजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होतात. तो ऋणानुबंध माझ्या हृदयावर कोरला गेला आहे.

पण आजची परिस्थिती वेगळी आहे. आज राजकारण करताना, जनतेसाठी काम करताना, आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना मला अपार अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा वेळी मला केवळ पदाची नव्हे, तर मनापासून, निर्भीडपणे आणि मोकळ्या मनाने साथ देणाऱ्या ताकदीची गरज आहे, हे मला वारंवार जाणवत आहे.

मी कधीही असे म्हणणार नाही की, माझा पक्ष किंवा माझे नेते मला ताकद देऊ शकत नाहीत. परंतु मागील काही वर्षांच्या अनुभवांवरून, माझ्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, प्रभाग क्रमांक एक असो वा इतर भाग तसेच माझ्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी, मला एका वेगळ्या निर्णयाकडे पाहावे लागत आहे. तरीही एक गोष्ट मी ठामपणे सांगते, माझ्या आयुष्यातील अंधाऱ्या काळात आपण दिलेली साथ मी कधीही विसरू शकत नाही. मी कायम तुमच्या ऋणात राहीन. जिथे जिथे, जेव्हा-जेव्हा संधी मिळेल, तेव्हा-तेव्हा त्या प्रेमाची आणि विश्वासाची परतफेड करत राहीन.

आजही मी तुम्हाला शब्द देते- जात-धर्म-पक्ष-विचार न पाहता, जेव्हा आपल्याला माझी गरज भासेल, तेव्हा कोणताही विचार न करता मी धावून येईन. अभिषेकच्या जाण्यानंतर माझ्या आयुष्यात एकच ध्येय उरले आहे, समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणे आणि माझ्या मुलांची व सहकाऱ्यांची काळजी घेणे. आज आपणच माझा परिवार आहात. म्हणून बदलत्या परिस्थितीत मला घ्यावा लागणारा हा निर्णय आपण समजून घ्याल, अशी माझी मनापासून अपेक्षा आहे.

आज मी शिवसेना या माझ्या राजकीय पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. हा निर्णय वेदनेतून घेतलेला आहे, पण माझ्या प्रामाणिकतेवर आणि आपल्या विश्वासावर कधीही तडा जाऊ देणार नाही. आपले प्रेम, आपली साथ आणि आपला आशीर्वाद मला कायम लाभो, हीच प्रार्थना.

आपली नम्र

तेजस्वी अभिषेक घोसाळकर

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More