महाराष्ट्र राजकीय भूकंपाच्या उंबरठ्यावर? BJP विरोधात शिंदे-ठाकरेंची युती? उद्धव म्हणाले, 'जास्तीत जास्त...'

Maharashtra Politics: 2022 पूर्वी शिवसेना एकच होती, पण शिंदेंच्या बंडानंतर पक्षात उभी फूट पडली. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या पक्षाच्या युतीमुळे शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं असून वेगवेगळ्या चाचपण्या सुरु असल्याची चर्चा आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 7, 2025, 02:24 PM IST
महाराष्ट्र राजकीय भूकंपाच्या उंबरठ्यावर? BJP विरोधात शिंदे-ठाकरेंची युती? उद्धव म्हणाले, 'जास्तीत जास्त...'
राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा (प्रातिनिधिक फोटो)

Maharashtra Politics: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये तीन वर्षांपूर्वी उभी फूट पडली. यानंतर दोन्ही गटांमध्ये न्यायालयीन लढाई सुरु आहे. राज्यपातळीवर हे दोन्ही गट एकमेकांविरोधी गटात आहेत. दोन्ही शिवसेना एकमेकांविरोधात लढले. ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मागील तीन वर्षांमध्ये कोणतीही युती झालेली नाही. दोन्ही शिवसेना एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिंदेंची शिवसेना महायुती (भाजप + राष्ट्रवादी अजित पवार गट) सोबत आहेत, तर ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडी (काँग्रेस + राष्ट्रवादी शरद पवार गट) सोबत आहे. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये म्हणजेच नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकींमध्ये स्थानिक पातळीवर दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची जोरदार चर्चा आहे. मुख्यतः भाजपला विरोध करण्यासाठी दोन्ही शिवसेना म्हणजेच ठाकरे आणि शिंदे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. 

Add Zee News as a Preferred Source

कुठे-कुठे युतीची शक्यता?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शिंदे आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  'कणकवली शहर विकास आघाडी' या बॅनरखाली महाविकास आघाडी आणि शिंदेंची शिवसेना एकत्रितपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत, मुख्यतः भाजपचे इच्छुक उमेदवार समीर नलावडे यांना विरोध करण्यासाठी ही युती होत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. ठाकरे गटाचे नेते संदेश पारकर यांना नगराध्यक्षपदासाठी प्रस्तावित केले असून शिंदे गटाने या नावाला पाठिंबा दर्शवला आहे. भाजपविरोधी मतांचे विभाजन टाळणे आणि जिल्ह्यात नारायण राणे यांच्या भाजपाचे वर्चस्व कमी करण्याच्या उद्देशाने ही युती होत असल्याचं सांगितलं जात आहे. दोन्ही गटांमध्ये गुप्त बैठका झाल्याचं सांगितलं जात आहे.  यामुळे राज्यभर चर्चा सुरू आहे. मात्र ही भूमिका केवळ स्थानिक पातळीवर आहे. 

इतरही वेगवेगळ्या युती चर्चेत

अहिल्यानगरमध्येही (अहमदनगर) महानगरपालिकेतही ठाकरे-शिंदे युतीची चर्चा होती रायगडमध्ये उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांची शिंदे गटाविरोधात युती झाल्याचं वृत्त आहे. बेस्ट कर्मचारी पतपेढी निवडणुकीत ठाकरे गट आणि मनसे यांच्या पॅनेलमध्ये शिंदे गटाची एक महिला सहभागी झाली आहे, ज्यामुळे ही अजब युती चर्चेत आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी शिंदेच्या शिवसेनेसोबत कोणत्याही अवस्थेत युती करायची नाही असं ठामपणे ठणकावलं आहे.

उद्धव ठाकरेंनी काय सांगितलं?

उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीनंतरही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी युती करू नका, असे आदेश दिले आहेत.  हे आदेश धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील बैठकीत दिले आहेत. "महाविकास आघाडी म्हणून लढा, तरुणांना संधी द्या, ताकदीने आणि विश्वासाने लढा, आणि जास्तीत जास्त जागा स्वत:कडे ठेवा," असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.  

 

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More