'मी आणि अजित पवार वेगळे....', महापालिका निवडणुका जाहीर होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, 'आमच्यात कटुता...'

Devendra Fadnavis on Alliance with Ajit Pawar NCP: महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांकडून नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकांप्रमाणे वेगवेगळ्या युती, आघाडींची घोषणा होण्याची शक्यता आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 15, 2025, 07:00 PM IST
'मी आणि अजित पवार वेगळे....', महापालिका निवडणुका जाहीर होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, 'आमच्यात कटुता...'

Devendra Fadnavis on Alliance with Ajit Pawar NCP: मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राज्यातील सर्व 29 पालिकांच्या निवडणुका एकाच वेळी पार पडणार असून, 15 जानेवारीला मतदान होईल आणि 16 जानेवारीला निकालाची घोषणा होईल. दरम्या निवडणुका जाहीर होताच, देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. जास्तीत जास्त ठिकाणी भाजपा आणि शिवसेनेची युती होईल असं त्यांनी जाहीर केलं आहे. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भातही मोठी घोषणा केली. 

Add Zee News as a Preferred Source

'भाजपा आणि राष्ट्रवादी वेगळे लढणार'

पुण्यात कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा समोरासमोर लढताना दिसेल असं त्यांनी जाहीर केलं आहे. तसंच शिवसेना शक्यतो सर्व ठिकाणी आमच्यासोबत असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.  "आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करत आहोत. जास्तीत जास्त ठिकाणी भाजपा आणि शिवसेनेची युती होईल. काही ठिकाणी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी युती होईल. तर काही ठिकाणी भाजपा-राष्ट्रवादीची युती होतानाही दिसेल. पुण्यात मात्र अजित पवारांची, आमची चर्चा झाली आहे. आम्ही दोघे इथले मोठे पक्ष आहोत. भाजपाने पाच वर्षं पुण्याचा चांगला विकास केला आहे. त्यामुळे कदाचित पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा समोरासमोर लढताना दिसेल. असं असलं तरी ही मैत्रीपूर्ण लढत असेल, कोणतीही कटुता नसेल," असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितंल आहे. 

बिगुल वाजलं! मुंबईसह सर्व 29 महापालिकांची निवडणूक जाहीर, कधी होणार मतदान? कधी लागणार निकाल? A to Z माहिती

 

पुढे त्यांनी म्हटलं की, "नागपूर आणि चंद्रपूर महापालिकेत आरक्षण 50 टक्क्यांच्या वर गेलं आहे. पण सुप्रीम कोर्टानेच निवडणुका घ्या असं सांगितलं आहे. फक्त जो निकाल आहे तो आमच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहील. आम्ही जो अंतिम निर्णय घेऊ, तो या 2 महानगरपालिकांना लागू असेल".

'कौल आमच्या बाजूने असेल'

"राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्याचा मला आनंद आहे. या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासकांच्या भरवशावर चालणं हे लोकशाहीला अभिप्रेत नव्हतं. न्यायालयाच्या निर्णयामुळे या संस्था दीर्घकाळ निर्वाचित प्रतिनिधींसिवाय होत्या. आता पुन्हा निवडणूक  होत आहेत. आमच्या शासनाने केलेलं काम पाहता कौल आमच्या बाजूने येईल, जनता आम्हाला पुन्हा शहर विकासाची संधी देईल असा विश्वास आहे," असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. 

'ठाकरेंच्या युतीचा फरक पडणार नाही'

ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर आमच्यावर काही फरक पडणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. "दोन्ही ठाकरे एकत्र आले तरी, काँग्रेस सोबत गेली तरी मुंबईकर आमच्या महायुतीलाच निवडून देतील. आमचा कारभार, आम्ही केलेला विकास आणि मराठी माणसाचं जोपासलेलं हित सामान्य मुंबईकरांनी पाहिलं असल्याने ते आमच्यासोबत राहतील," असंही त्यांनी म्हटलं. 

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More