)
Maharashtra Politics: ऐन दिवाळीत नेत्यांमध्ये राजकीय फटाके वाजू लागले आहेत. मतदान यादीतील घोळावरुन विरोधकांनी सत्ताधा-यांना घेरलंय. याच पार्श्वभूमीवर आमच्याकडे हायड्रोजन बॉम्ब आहे असा इशारा राष्ट्रवादी SPचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महायुतीकडे अॅटम बॉम्ब असल्याचं वक्तव्य केलं होते. यावरुन आव्हाडांनी शिंदेंना टोला हाणला.
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि महाविकास आघाडीनं निवडणूक आयोगाविरोधात आरोपांचे फटाके फोडण्यास सुरुवात केलीय. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात बोगस मतदार घुसवण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. राज ठाकरेंचे आरोप तर निवडणूक आयोगासाठी डोकेदुखी ठरलेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनीही त्यांच्या मतदारसंघात हजारोंच्या संख्येनं बोगस मतदार घुसडवण्यात आल्याचा आरोप केला.
राज ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांसह महाविकास आघाडीचे नेते करत असलेल्या आरोपांना फारशी किंमत देत नसल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. विरोधकांचे आरोप म्हणजे लवंगी फटाके आणि सुरसुरी आहेत. तर महायुतीचा ऍटम बॉम्ब असल्याचा दावा शिंदेंनी केलाय. एकनाथ शिंदेंनी आरोप केल्यावर शांत बसणार ते जितेंद्र आव्हाड कसले? एकनाथ शिंदे ज्या ऍटम बॉम्बची चर्चा करतात तो जुना झाल्याचा टोला जितेंद्र आव्हाडांनी केलाय. दिवाळीत छोट्या मोठ्या बॉम्बची फटाक्यांची चर्चा साहजिकच आहे. एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाडांनी मात्र ही चर्चा थेट ऍटमबॉम्ब ते हायड्रोजन बॉम्बपर्यंत नेऊन ठेवलीय. आता दिवाळीनंतर कोणत्या आरोपांचे बॉम्ब हे नेते फोडतात हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.