अशोक चव्हाणांना BJP मध्ये घेऊन शहिदांचा अपमान धुवून काढला का? राऊतांचा सवाल
Ashok Chavan Resign : माजी मुख्ममंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. मात्र अशोक चव्हाणांना भाजपमध्ये घेऊन शहिदांचा अपमान धुवून काढला का असा सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे.
Ashok Chavan Resign : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यांनंतर अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान, भाजप अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावरुन विरोधकांनी भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अशोक चव्हाणांच्या भाजपात जाण्यावरुन पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
"काँग्रेस म्हणजे चव्हाण कुटुंब. आता आमच्यापुढे पेच आहे की पंतप्रधान मोदी देशाला काय तोंड दाखवतील? कारगिल युद्धाच्या शहिदांच्या भूखंडांवर अशोक चव्हाण यांनी कशा प्रकारे घोटाळा केला आणि शहिदांचा अपमान केला हे पंतप्रधान मोदींनी सांगितले होते. भाजपने याविरोधात आंदोलन केले होते. आज त्या शहिदांच्या अपमानाचे काय झालं? अशोक चव्हाणांना भाजपमध्ये घेऊन अपमान धुवून काढला का? सगळ्याच पक्षातील भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात घेऊन भाजप जगातल्या राजकारणात नवा आदर्श निर्माण करत आहे. भाजपने काँग्रेसमुक्त भारत ही घोषणा बदलायला हवी. त्यांनी काँग्रेसचे शुद्धीकरण चालवले आहे. भाजप काँग्रेससोबत अशा प्रकारे युती करत आहे. भाजप देशाचे राजकारण ज्या पद्धतीने नासवत आहे. अशाप्रकारे 400 पार उडी मारता येईल असे भाजपला वाटत असेल तर ते 200 पारही जाणार नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
"देवेंद्र फडणवीसांनी वारंवार आदर्श घोटाळा कसा झाला हे समजावून सांगितले. त्याच्या व्हिडीओ क्लिप उपलब्ध आहेत. त्यांनी स्वतःच्या क्लिप भाजप कार्यालयात पाहाव्यात. मोदी काय बोलले होते तेही ऐकावं आणि मग शांतपणे विचार करावा की कुठे नेऊन ठेवलाय भाजपा माझा. आदर्श घोटाळ्यावर हल्ला करणारे हेच भाजपचे लोक. नरेंद्र मोदींना भविष्यात देशामध्ये तोंड लपवून फिरावं लागेल. त्यांनी ज्यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला त्यांनी मोदींनी भाजपमध्ये आणून पवित्र केले हे दुर्दैव आहे," असेही संजय राऊत म्हणाले.
भाजपा पक्ष फोडण्याचे काम करत आहे - विजय वडेट्टीवार
"अशोक चव्हाण हेच त्यांच्या राजीनाम्याचे कारण स्पष्ट करू शकतील. मात्र, मधल्या काळात त्यांच्यामागे अनेक चौकशींचा फेरा लागल्याची माहिती आमच्याकडे येत होती. परंतु ती चौकशी नेमकी कशाची होती, हे काही कळले नाही. त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय आपल्यासाठी धक्कादायक आहे. पण, ज्या पद्धतीने भाजपा पक्ष फोडण्याचे आणि इतर पक्षांचे नेते पळवण्याचे काम करत आहे, या प्रकाराला जनता कंटाळलेली आहे. मतदारराजा या फोडाफोडीच्या राजकारणाला वैतागला असून येत्या निवडणुकीत अशा प्रवृत्तींना नक्कीच धडा शिकवेल," अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.