)
Maharashtra Politics: "महाराष्ट्राच्या राजकारणातली भाऊबंदकी संपून मनोमीलनाचे प्रयोग सुरू झाले व या मनोमीलनास तुफान प्रतिसाद मिळत आहे. हे मनोमीलन एकनाथ शिंदे वगैरे अमित शहांच्या हस्तकांना पटलेले दिसत नाही," असा टोला खासदार संजय राऊत यांनी 'सामना'मधील 'रोखठोक' सदरामधून लगावला आहे.
"उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अंबरनाथ येथील एका कार्यक्रमात लिहून आणलेले भाषण वाचून दाखवले. त्यात ते म्हणाले, "पूर्वी 'भाऊबंदकी' नाटक गाजले होते. आता मात्र राज्यात 'मनोमीलन' नाटक सुरू आहे." शिंदे यांचे हे विधान म्हणजे राज्यात सुरू असलेल्या मराठी एकजुटीविरुद्धची मळमळ आहे. भाऊबंदकी आणि आपापसांतील वैराने मराठेशाहीचा घात झाला. पेशव्यांनी मराठा साम्राज्य भारताच्या सीमा ओलांडून अटकेपार नेले, ते मराठ्यांतील साठमारीने नष्ट झाले. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व आले ते शिंदे वगैरे लोकांच्याच कलह व बेइमानीमुळे नष्ट झाले. त्यामुळे शिंदे यांना महाराष्ट्रातील भाऊबंदकी कायम राहावी व त्या दुहीतून स्वार्थ साधावा असे वाटत असेल तर ते समजण्यासारखे आहे. त्यामुळे 'भाऊबंदकी' हवी, 'मनोमीलन' नको, ही त्यांची भूमिका ते मांडत आहेत," असं राऊतांनी म्हटलं आहे. "संयुक्त महाराष्ट्र लढ्यात `सूर्य-चंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही' अशी भूमिका त्या वेळचे ज्येष्ठ काँग्रेस नेते स. का. पाटील घेत होते. ते सदोबा आणि हा मिंधोबा म्हणजे एकाच माळेचे मणी," असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.
"ज्या 'भाऊबंदकी' नाटकाचा उल्लेख शिंदे करतात, त्या नाटकाविषयी त्यांना कितपत माहिती आहे? कुणीतरी लिहून दिलेली भाषणे वाचायची व 'मीडिया'त पैसे वाटून त्यावर प्रसिद्धी घ्यायची हे या लोकांचे धोरण. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर या क्रांतिकारक नाटककाराने हे नाटक 1909 साली लिहिले. पेशवेकाळातील भाऊबंदकी आणि सत्तासंघर्षावर आधारित हे नाटक आहे. त्यात राजकीय उलथापालथ, कट-कारस्थाने आणि पाठीत खंजीर खुपसण्याचे प्रसंग असल्याने या नाटकाने शिंदे यांना आकर्षित केले. 'भाऊबंदकी' नाटकाच्या पहिल्या अंकात नारायणरावांच्या खुनाची महत्त्वाची घटना पार पडते, तरीही पुढच्या तिन्ही अंकांत नाटक खिळवून ठेवते ते त्यातील पात्र योजनेमुळे. शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे केले ते स्वराज्याच्या शत्रूंशी म्हणजे अमित शहांशी जी हातमिळवणी केली ते सर्व प्रकार खाडिलकरांच्या 'भाऊबंदकी'त आहेत. शिंदे हे 'भाऊबंदकी'तले खलनायक आहेत," असं राऊतांनी म्हटलं आहे.
"अति महत्त्वाकांक्षी, लोभी, लाचार ही राघोबाची सर्व विशेषणे शिंदेंना चपखल बसतात. नारायणरावांचा खून हे सत्तेसाठी केलेले षड्यंत्र होते. त्यात राघोबाचा हात होता. भाऊबंदकीचे सूत्रधार म्हणून राघोबाचा उल्लेख होतो व शिंदे हे नव्या राजकारणातले 'राघोबा' आहेत. दुसरे असे की, महाराष्ट्रात घराघरांत भांडणे लावण्याचे व घरे फोडण्याचे काम भारतीय जनता पक्षाने सुरू केले. राज्यभरात भाऊबंदकीचा धुमाकूळ घालून राज्य करायचे हे भाजपचे सूत्र आहे. त्या सूत्रात एकनाथ शिंदे यांनाही घेतले. त्यामुळे भाऊबंदकी हे महाराष्ट्रातील घराघरांतले दुखणे झाले," असा उल्लेख लेखात आहे.
"शिंदे यांना 'भाऊबंदकी' नाटकाची आठवण झाली, पण ज्या नव हिंदुत्ववाद्यांचे हस्तक म्हणून ते वावरत आहेत त्या हिंदूंमध्ये महाभारत काळापासून भाऊबंदकी आणि कलह आहेत. 'श्यामची आई'मध्ये साने गुरुजी सांगतात, "या भारतवर्षात भाऊबंदकी फार! कौरव-पांडवांच्या वेळेपासून आहे, ती अजून आहे. भावाभावांत जेथे प्रेम नाही तेथे स्वतंत्रता कशी नांदेल? मोक्ष कसा राहील?" हे सत्य आहे. ज्यांच्या पालखीचे भोई आज शिंदे वगैरे लोक आहेत तेथे पैसा, स्वार्थ व कपट याशिवाय दुसरे काहीच नाही. भाजपमध्ये मोदी कालखंड सुरू झाल्यावर पित्यासमान लालकृष्ण आडवाणी यांना 12 वर्षांपासून जवळजवळ 'हाऊस आरेस्ट' म्हणजे बंदिवान करून ठेवले गेले व उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे नक्की काय झाले ते आजही कळत नाही. हे सर्व स्वार्थ, कलह, महत्त्वाकांक्षेतून घडले. शिंदे यांना आठवलेल्या 'भाऊबंदकी'चे हे नाट्य प्रवेश आहेत," असा टोला राऊतांनी लगावला आहे.