Supriya Sule Whatsapp Status: पुण्याच्या बालेवाडीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा वर्धापन दुपारी पार पडत आहे. या वर्धापन दिनासाठी राज्यातील विविध भागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते दाखल झाले आहेत. पक्षाचे संस्थापक शरद पवार आणि विद्यमान अध्यक्ष अजित पवार यांच्या पक्षांनी एकत्र यावे का या संदर्भातील चाचपणी या मेळाव्यात होऊ शकते असं म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही पक्षाचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. असं असतानाच शरद पवार यांच्या खासदार कन्या आणि अजित पवार यांची बहीण सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेचा विषय ठरत आहे. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला सुप्रिया सुळेंनी त्यांच्या खासगी व्हॉट्सअप क्रमांकावरुन ठेवलेलं स्टेटस चर्चेत आहे.
सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या आईने दिलेला एक सल्ला व्हॉट्सअप स्टेटसवरुन शेअर केला आहे. मात्र सुप्रिया सुळेंनी या स्टेटसमध्ये वापरलेल्या भाषेवरुन वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात आहेत. सुप्रिया सुळे यांनी स्टेटसमुळं चर्चेला उधाण आलं आहे. सुप्रिया सुळे यांनी त्यांची आई प्रतिभा पवार यांनी दिलेला एक सल्ला आपण रोज स्वत:ला आठवण करुन देत असतो असं म्हटलं आहे. हा सल्ला काय आहे हे सांगितलं आहे. मात्र हे स्टेटस अपलोड केल्यानंतर काही वेळाने त्यांनी स्पष्टीकरण असं म्हणत अन्य एक स्टेटस अपडेट केलं.
"आईला सगळं माहिती असतं. माझ्या पालकांनी मला एक सल्ला दिला होता. माझ्या आईने जे मला सांगितलंय त्याची मी स्वत:ला रोज आठवण करुन देते. 'सहन करायला शिक'," असं सुप्रिया सुळेंच्या पहिल्या स्टेटसमध्ये म्हटलं आहे. त्यांनी हे स्टेटस काल सायंकाळी सहा वाजून 26 मिनिटांनी आपल्या खासगी क्रमांकावरुन अपडेट केलं होतं.
त्यानंतर त्यांनी अपडेट केलेल्या स्टेटसमध्ये आधीच्या स्टेटससंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. "सहन करायला शिक, आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असतो. आपण प्रयत्न करत राहायचे. त्यावर आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होत असतो. आपण काही करु शकत नाही, परिस्थिती आपल्या हातात नसतात... तेव्हा घट्ट व्हायचं आणि सहन करायचं... कर्तव्य करत राहायची. आपले संस्कार कधी विसरायचे नाहीत...", असं दुसऱ्या स्टेटसमध्ये लिहिलेलं होतं.
विशेष म्हणजे अजित पवार यांनी सोमवारी झालेल्या वसंतदादा पाटील शुगर इंस्टीट्यूटच्या बैठकीमध्ये शरद पवार यांच्यापासून आपली खुर्ची लांब घेतली होती. यामुळे अनेकांच्या नजरा उंचावल्या होत्या. त्यातच दिल्लीत असलेल्या सुप्रिया वर्धापनदिनाच्या कार्यक्रमानिमित्त सोमवारी सायंकाळी महाराष्ट्रात परतल्या. दिल्लीतील पक्षाच्या बैठकीनंतर हे स्टेटस अपडेट करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. विमानात बसल्यानंतर आपल्याला अचानक आईने दिलेला हा सल्ला अचानक आठवल्याने तो स्टेटसला ठेवला असं स्पष्टीकरण सुप्रिया सुळेंनी पत्रकारांशी बोलताना दिलं.