)
Maharashtra Weather News : कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रामध्ये बहुतांश जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावल्याचं चित्र आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मात्र उष्मा कायम आहे. पावसासाठी पूरक स्थिती असली तरीही काही जिल्ह्यांमध्ये तापमानात अपेक्षित घट झालेली नाही. दरम्यान, पुढील 24 तासांमध्ये विदर्भातील अनेक जिल्ह्यांसह मराठवाड्यातसुद्धा पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, कोकणातील किनारपट्टी भागांसह पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसास पोषक स्थिती निर्माण होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
पालघर, ठाणे, रायगड आणि मुंबई शहरासाठी उष्णतेपासून इतक्यात दिलासा मिळणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे. तर, या भागांमध्ये दमट हवामानामुळं दाह आणखी वाढल्याचं जाणवणार असल्यानं इतक्यात नागरिकांची होरपळीपासून सुटका होणार नसल्याचच स्पष्ट होत आहे. उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर, नाशिक या जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे. दरम्यान राज्यात अद्यापही मान्सूननं प्रवेश केला नसून, आता मान्सूनच्या सरी केव्हा बरसणार याचीच उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.
दिल्ली 38
मुंबई - 33
कोलकाता - 38
चेन्नई - 36
बंगळूर - 29
श्रीनगर - 26
केरळाच्या पूर्वेकडे पोहोचलेला मान्सून येत्या चार ते पाच दिवसांमध्ये संपूर्ण राज्य व्यापून पुढच्या रोखानं प्रवास करण्याची अपेक्षा आहे. तत्पूर्वी केंद्रीय हवामानशास्त्र विभागानं देशातील 17 राज्यांना वादळी हवामानाचा इशारा देत सतर्क केलं आहे. सोसाट्याचा वारा आणि पाऊस यांसह गारपिटसदृश्य वातावरण देशात पुढील 24 तासांत पाहायला मिळेल. तर, केरळासह दक्षिण भारतात पुढचे 6 ते 7 दिवस पावसाचे असतील असंच स्पष्ट होत आहे.
आयएमडीच्या माहितीनुसार केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, अंदमान निकोबार, छत्तीसगढ, महाराष्ट्र, गुजरा, आसाम आणि मेघालयमध्ये पावसाचा अंदाज य़आहे, तर, उत्तरेकडील पर्वतीय राज्यांमध्ये तापमानात काहीशी घटसुद्धा अपेक्षित आहे.
दरम्यान, लक्षद्वीप, कोमोरिन क्षेत्रासह अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील काही भागामध्ये मान्सूननं मजल मारली आहे. मंगळवारी मान्सूनची फारशी प्रगती झाली नसली तरीही केरळ आणि तामिळनाडूत त्यानं प्रगती केली. त्यामुळं आता महाराष्ट्रात पुढील 4 ते 5 दिवसांत मान्सून दाखल होणं अपेक्षित आहे. मुंबईची वेस ओलांडण्यासाठी मात्र या मोसमी वाऱ्यांना जून महिन्याचा दुसऱ्या आठवड्यापर्यंतचा कालावधी लागणार आहे.