याच मंदिरात झाली विश्वाची उत्पत्ती अन् इथंच होणार नाश; महाराष्ट्रातील अनोखं मंदिर आहे कुठे? तिथे पोहोचायचं कसं?

Maharashtra Tourist Places: तुमच्यापैकी अनेकांना फोटो पाहताच हे मंदिर कोणतं हे समजलं असेल तर काहींना या मंदिराची काहीच कल्पना नसेल. पण हे मंदिर नेमकं आहे कुठे तिथे जायचं कसं हे जाणून घेऊयात सविस्तरपणे...

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 1, 2026, 04:44 PM IST
याच मंदिरात झाली विश्वाची उत्पत्ती अन् इथंच होणार नाश; महाराष्ट्रातील अनोखं मंदिर आहे कुठे? तिथे पोहोचायचं कसं?
तीन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे हा गड (photo- instagram/_ajit_wakchaure_)

Maharashtra Tourist Places: महाराष्ट्रामध्ये वर्षभर भटकंती करता येतील अशी अनेक ठिकाणे आहेत. त्यापैकी बऱ्याच ठिकाणांना ऐतिहासिक तसेच धार्मिक महत्त्व आहे. मात्र ऐतिहासिक आणि धार्मिक अशा दोन्ही अर्थांनी महत्त्वाची असलेली आणि वर्षभर भटकंती करता येईल अशी मोजकी ठिकाणं आहेत. महाराष्ट्रातील अशाच मोजक्या ठिकाणांपैकी एक ठिकाण हे विश्वाच्या उत्पत्तिचं केंद्र असल्याचं मानलं जातं. याच ठिकाणाहून जगाच्या निर्मितीला सुरुवात झाली आणि याच ठिकाणी अंत होणार आहे अशी मान्यता असून हे ठिकाण दिसायला फारच सुंदर आहे. तिथे पोहचण्याच्या प्रवासही तितकाच थरारक आणि अंगावर रोमांच उभा करणार आहे. याच ठिकाणाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Add Zee News as a Preferred Source

प्राचीन मंदिर अन् जगाचा आरंभ व अंत

खरं या ठिकाणी असलेल्या एका प्राचीन मंदिरापासून जगाची सुरुवात झाली आणि इथेच जगाचा शेवट होणार अशी एक मान्यता आहे. हे भगवान शंकराचं मंदिर असून या शिवमंदिराला रहस्यांची चावी मानलं जातं. या मंदिराचं नाव आहे, केदारेश्वर गुंफा मंदिर! या मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका गुहेच्या मध्यभागी शिवलिंग आहे जे कायम पाण्यात असतं. या गुहेतील पाणी फार थंड असतं. या शिवलिंगाबद्दल एक अध्यायिका सांगितली जाते. ती म्हणजे या शिवलिंगाच्या आजूबाजूला चार खांब होते. त्यापैकी तीन खांब कोसळले आहेत. आता चौथा खांब कोसळला की प्रलयाला सुरुवात होणार आणि जग संपणार!

हा गड कोणता?

तुमच्यापैकी जे नियमितपणे ट्रेकिंगला जातात किंवा या क्षेत्राशी संबंधित आहे त्यांना आतापर्यंत अंदाज आला असेल की आपण कोणत्या गडाबद्दल बोलतोय. होय आपण, हरिश्चंद्रगडाबद्दलच (Harishchandragad)  बोलत आहोत. हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ला असून तो पुणे, ठाणे, अहमदनगर अशा तिन्ही जिल्ह्यांच्या सीमांपासूनजवळ आहे. हा किल्ला 4 हजार 670 फूट उंचीवर आहे. हा किल्ला येथील प्राचीन गुहा, मंदिरे, तलाव आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे ट्रेकर्सला वर्षाचे 12 महिने भुरळ घालतो. आहे. हा किल्ला कळसुबाई-हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्याचा भाग असून या ठिकाणी ट्रेकिंग करताना वेगवेगळे पक्षी आणि प्राणी पाहायला मिळतात.

ऐतिहासिक संदर्भ

हरिश्चंद्रगडचा इतिहास किती जुना आहे असं विचारलं तर अगदी सहाव्या शतकापासून या किल्ल्याचा उल्लेख आढळतो. हा किल्ला कळचुरी राजवंशाच्या काळात बांधला गेला असं सांगितलं जातं. मत्स्यपुराण, अग्निपुराण आणि स्कंदपुराणांमध्ये या किल्ल्याचा उल्लेख आहे. हा किल्ला आधी मुगल आणि मराठ्यांच्या अधिपत्याखाली होता. 14 व्या शतकात संत चांगदेव येथे ध्यान करायचे असंही हिंदू पौराणिक कथांनुसार सांगितलं जातं. हा किल्ला लष्करी आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्वाचा मानला जातो. 

कसं जायचं?

हरिश्चंद्रगडापर्यंत मुंबई, पुणे आणि नाशिकपासून सहज पोहोचता येतो. खासगी वाहन किंवा बसने किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांपर्यंत आणि नंतर ट्रेक करून वर मंदिरापर्यंत जाता येतं. मुंबईपासून हा किल्ला साधारण 200 किलोमीटरच्या आसपास आहे. मळशेज घाटमार्गाने खुबी फाटा आणि तिथून कल्याणवरून मळशेज घाटमार्गे बसने 'खुबी फाट्या'पर्यंत पोहोचता येतं. तेथून बेस व्हिलेजपर्यंत जाता येतं. पुण्यावरुन हा किल्ला साधारणपणे  150 किलोमीटरवर आहे. पुणे-नाशिक मार्गावरुन आळेफाट्यावरुन डावीकडे ओतूरमार्गे गणेश खिंडीतून या गडाच्या बेस व्हिलेजपर्यंत जाता येतं. नाशिकवरुन हा किल्ला साधारणपणे 180 किलोमीटरवर असून नाशिकवरूनही आळेफाटामार्गेच इथे पोहोचता येतं.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More