Maharashtra Election Results: '...म्हणून एवढा मोठा विजय मिळाला'; CM शिंदेंची हात जोडत पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Eknath Shinde First Comment: महायुतीचं सरकार राज्यामध्ये पुन्हा सत्तेत येणार असं पहिल्या चार तासांमधील कलांनंतर जवळपास स्पष्ट झालं आहे असं असतानाच आता मुख्यमंत्री शिदेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 23, 2024, 12:38 PM IST
Maharashtra Election Results: '...म्हणून एवढा मोठा विजय मिळाला'; CM शिंदेंची हात जोडत पहिली प्रतिक्रिया title=
प्रसारमाध्यमांशी बोलताना नोंदवलं मत

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Eknath Shinde First Comment: महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येणार असं विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या चार तासांमधील आकडेवारीनंतर स्पष्ट झालं आहे. महायुतीने 217 जागांवर आघाडी मिळवली असून महाविकास आघाडी 52 जागांवर आघाडीवर आहे. 18 अपक्ष उमेदवार आघाडीवर असल्याचं दिसत आहे. महायुतीचं सरकार येणार हे जवळपास निश्चित झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. "मनापासून काम केलं म्हणून हा एवढा मोठा विजय मिळाला आहे," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हात जोडून म्हणाले...

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अगदी हात जोडून मतदारांचे आभार मानले. "जनतेनं भरभरुन महायुतीला मतदान केलं. गेले अडीच वर्ष महायुतीने जे काम केलं त्याची पोचपावती या निवडणुकीमध्ये जनतेनं दिली. म्हणून मी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो, त्याचे धन्यवाद देतो," असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच पुढे बोलताना एकनाथ शिंदेंनी, "जे काम आम्ही अडीच वर्षात केलं. त्याची नोंद घेत कामाची पोचपावती आम्हाला दिलेली आहे," असंही या निकालावर भाष्य करताना शिंदेंनी म्हटलं आहे. 

आमची जबाबदारी वाढली

"आम्ही अडीच वर्षात जे काम केलं त्यापेक्षा आता पुढील कार्यकाळात आमची जबाबदारी वाढली आहे," असं सांगताना एकनाथ शिंदेंनी महायुती अधिक जोमाने काम करणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत. "मी जनतेला त्रिवार वंदन करतो. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. सर्व मनापासून काम करत होते. म्हणून एवढा मोठा विजय मिळतोय. मी कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाच्या मतदारांना धन्यवाद देतो. त्यांनी मला मोठ्या लीडने निवडून दिलं आहे. सर्व मतदारांचे मी आभार मानतो," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरस असेल अशी शक्यता व्यक्त केली जात होता. मात्र निवडणुकींचा निकाल एकहाती लागला आहे. 

शिंदेंना मोठी आघाडी

दहाव्या फेरीनंतर कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदेंनी 45 हजार 662 मतांनी आघाडी घेतली आहे. दहाव्या फेरीमध्ये शिंदेंना 6635 मतं मिळाली असून केदार दिघेंना 1749 मतं मिळाली आहेत. काँग्रेसचे बंडखोर आमदार मनोज शिंदेंना 27 मतं मिळाली आहेत. नोटाला 110 मतं मिळाली असून एकूण 8607 मतं दहाव्या फेरीत मोजली गेली आहेत. या फेरीत शिंदेंनी 4776 मतांनी आघाडी घेतली. एकूण मतांचा विचार केल्यास शिंदेंना 61 हजार 637 मतं मिळाली असून केदार दिघेंना 15 हजार 972 मतं मिळाली आहेत.