Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: "सर्व मतदारांचे मन:पूर्वक आभार," असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेच्या निकालानंतर मतदारांना धन्यवाद म्हटलं आहे. आपल्या अधिकृत एक्स (ट्वीटर) हॅण्डलवरुन मुख्यमंत्री शिंदेंनी प्रतिक्रिया नोंदवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांचा आवर्जून उल्लेख केला आहे. तसेच महायुतीला मिळालेला विजय हा लाडक्या बहिणींचा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.


भक्कम पाठिंब्यामुळेच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"कौल जनतेचा.. महाविजय महायुतीचा! राज्यातील तमाम लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिकांनी महायुतीला दिलेल्या भक्कम पाठिंब्यामुळेच आजचा हा महायुतीचा महाविजय शक्य झाला आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे संस्कार, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमित भाई शाह यांचे सहकार्य, विकास आणि जनहित योजनांची योग्य सांगड, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची मेहनत व लाडक्या बहीण-भावांचे आणि जनतेचे प्रेम यांचा हा महाविजय आहे. मी आपणा सर्वांचे अभिनंदन करतो तसेच आभार व्यक्त करतो," असं शिंदेंनी पहिल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.



कॉमन मॅनने सुपरमॅनसारखे...


"समर्पित भावनेनं महाराष्ट्राच्या समृध्दीसाठी आणि सामन्यांच्या कल्याणासाठी राबणाऱ्या महायुती सरकारला निर्विवाद आणि घवघवीत यश मिळाले आहे," असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. "महाराष्ट्रात महायुतीच लाडकी ठरली. हा विजय माझ्या लाडक्या बहिणींचा आहे, लाडक्या भावांचा, लाडक्या शेतकऱ्यांचा आहे. राज्यातल्या कॉमन मॅनने सुपरमॅनसारखे मतदान केले. त्यामुळे हा विजय राज्यातल्या सर्वसामान्यांचा आहे, सर्वसामान्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या सरकारचा आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेबांच्या आशीर्वादाचा, विचारधारेचा हा विजय आहे," असं मुख्यमंत्री शिदेंनी म्हटलं आहे.


मतदारांना दिलं वचन


"विश्वनेते आणि देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, कणखर गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या पाठबळामुळे जनतेच्या मनातले सर्वसामान्यांचे सरकार राज्यात सत्तेत येऊ शकले," असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं आहे. "देवेंद्रजी आणि अजितदादांच्या सहकाऱ्याने या राज्यात ऐतिहासिक काम करता आले. यापुढे अधिक उत्साहाने आणि वाढलेल्या जबाबदारीच्या भावनेसह जोमाने काम करण्याची उमेद या निर्विवाद विजयाने दिली आहे. हा आशीर्वाद शिरोधार्य मानून महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर दुप्पट वेगाने नेण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. शरीरातला प्रत्येक कण आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण लाडक्या महाराष्ट्रासाठी वाहून घेणार, हे वचन," असा शब्द मुख्यमंत्री शिंदेंनी दिला आहे. 



"पुन्हा एकदा सर्व मतदारांना त्रिवार दंडवत," असं म्हणत शिंदेंनी पोस्टचा शेवट केला आहे.