पाऊस परतीच्या वाटेवर लागताच सूर्य तळपला; कुठं बसणार ऑक्टोबर हिटचा चटका?

Maharashtra Weather News : मान्सून परतण्याच्या वाटेवर... राज्यात वाढला उष्णतेचा कहर. सर्वाधिक तापमान तुमच्या शहरात/ खेड्यात? पाहा... 

सायली पाटील | Updated: Oct 11, 2025, 08:02 AM IST
पाऊस परतीच्या वाटेवर लागताच सूर्य तळपला; कुठं बसणार ऑक्टोबर हिटचा चटका?
Maharashtra weather news 11th oct no rain predictions temprature rise october heat mumbai konkan vidarbha nashik

Maharashtra Weather News : यंदाच्या वर्षी साधारण पाच ते सहा महिने मुक्काम करणारा मान्सून अखेर राज्यात त्याचा प्रभाव आणि तीव्रता कमी करत परतीच्या प्रवासासाठी निघाला आहे. असं असतानाच या हवामान प्रणालीतील बदलामुळं राज्यात तापमानात चढ- उतार सुरू झाले आहेत. मुंबई शहर आणि उपनगरांसह बहुतांश भागांमध्ये उन्हाचा दाह सोसेनासा होत आहे. दुपारच्या वेळी उष्मा अधिक तीव्रतेनं जाणवत असल्या कारणानं नागरिकांनासुद्धा या बदलांदरम्यान आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

शक्ती चक्रीवादळ ओसरल्यानंतर अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र आणि चक्राकार वाऱ्याच्या स्थितीमुळं कोकणातील दक्षिणेकडचा भाग आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरींची अपेक्षा आहे. मात्र कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग भाग वगळता उर्वरित राज्यातवर पावसाचं सावट नाही हेच स्पष्ट होत आहे. ज्यामुळं आता तापमानवाढ नागरिकांना बेजार करणार हे नाकारता येत नाही. राज्यात सध्या उष्णतेचं प्रमाण अधिक असणाऱ्या ठिकाणांमध्ये चंद्रपूर 34.4 अंश सेल्सिअल, नागपूर 34.1 अंश सेल्सिअस, वर्धा 34.4 अंश सेल्सिअस अशा ठिकाणांचा समावेश आहे. 

मुंबईतूनही पाऊस हद्दपार... 

राजस्थानमधून साधारण 17 सप्टेंबर रोजी मान्सूनचे वारे परतीचा प्रवास सुरू करतात. यंदा मात्र त्यांचा हा प्रवास 14 सप्टेंबरपासून सुरून झाला. पुढे हाच प्रवास रेंगाळला आणि पावसाचा मुक्काम वाढला. यंदा राज्यातही नियोजित वेळेहून पाच दिवस उशिरानं मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला. त्यामुळं आता पोषक वातावरण राहिल्यास 15 ऑक्टोबरपर्यंत राज्यातून मोसमी पाऊस पूर्णपणे माघार घेण्याचा अंदाज आहे.

उत्तरेकडे वाढतोय थंडीचा कडाका... 

इथं महाराष्ट्रासह मध्य भारतामधून पाऊस माघार घेत असतानाच उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. ज्यामुळं उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीरचा पर्वतीय भाग इथं हिमवर्षावास सुरुवात झाली आहे. तर, पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्लीतही पहाटेच्या वेळी तापमानाच घट नोंदवली जात असल्यानं हिवाळ्यानं देशाचं दार ठोठावल्याचं स्पष्ट होत आहे. आता हा हिवाळा महाराष्ट्राला कधी हुडहूडी भरवतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. 

FAQ

यंदाच्या वर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास कधी सुरू झाला आणि कधी पूर्ण होईल?
मान्सूनचा परतीचा प्रवास राज्यात नियोजित वेळेपेक्षा 5 दिवस उशिरा सुरू झाला आहे. राजस्थानमधून 17 सप्टेंबरऐवजी 14 सप्टेंबरपासून हा प्रवास सुरू झाला, पण तो रेंगाळला. आता पोषक वातावरण राहिल्यास 15 ऑक्टोबरपर्यंत राज्यातून मोसमी पाऊस पूर्णपणे माघार घेण्याचा अंदाज आहे.

राज्यात सध्या पावसाची शक्यता कुठे आहे?
शक्ती चक्रीवादळ ओसरल्यानंतर अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्राकार वाऱ्यांमुळे कोकणातील दक्षिणेकडील भाग आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरींची अपेक्षा आहे.

 मुंबई आणि उपनगरांमध्ये सध्या हवामान कसे आहे?
मुंबई शहर आणि उपनगरांसह बहुतांश भागांमध्ये उन्हाचा दाह सोसवतोय. दुपारच्या वेळी उष्मा अधिक तीव्रतेने जाणवत आहे. यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More