Maharashtra Weather News : हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 6 मे रोजी पुन्हा एकदा हवामान बदलांचेच वारे देशभरात वाहणार आहेत. यामध्ये प्रामुख्यानं 11 राज्यांसाठी सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.

Maharashtra Weather News : मध्य प्रदेशच्या पूर्वेपासून नजीकच्या भागावर चक्राकार वाऱ्यांची रचना पाहायला मिळत असल्यानं विदर्भापासून मराठवाड्यापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. ज्यामुळं पुढील 24 तासांमध्ये मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणात मात्र हवामान उष्ण आणि दमट राहणार असून, मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही अशीच स्थिती पाहायला मिळेल असा अंदाज आहे. राज्याच्या उर्वरित भागांमध्ये तापमानात फारशी घट अपेक्षित नसून, उकाड्यानं नागरिक हैराण होणार हेच स्पष्ट होत आहे.
सध्या कोकणाच्या दिशेनं सुट्टी असणारी बरीच मंडळी रवाना झाली आहेत. मात्र याच कोकणात उष्णतेचा तडाखा बसत असल्यानं ही तापमानवाढही अनेकांनाच असह्य झाल्याचं स्पष्ट होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकणा हवेतील आर्द्रतेचं प्रमाण वाढल्याने मुंबईपासून ते अगदी कोकणातील बहुतांश भागात अधिक प्रमाणात उष्मा जाणवू लागला आहे. अलिबागपासून रत्नागिरीपर्यंत हीच परिस्थिती असल्याचं पाहायला मिळत असून पारा सरासरी 37.5 अंशांवर पोहोचला आहे. बुधवारपासून पुढील तीन दिवस कोकण पट्ट्यात उष्ण आणि दमट वातावरणाचीच स्थिती राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
एप्रिलमध्ये सक्रिय झालेल्या पश्चिमी झंझावाताच्या प्रभावामुळं कोकण पट्ट्यात कमाल तापमानात चढ उतार पाहायला मिळाले. ज्यामुळं पाऊस आणि गारपिटीचीही नोंद झाली होती. सध्या मात्र हा परिणाम निवळला असून, आता उष्ण आणि दमट वातावरणामुळे इथं तापमानवाढीचा सामना करावा लागत आहे.
केंद्रीय हवामान विभागानं उत्तर भारतातील अनेक राज्यांना पुढच्या 24 तासांसाठी मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीचा इशारा जारी केला आहे. फक्त मैदानी भाग नव्हे, तर पर्वतीय क्षेत्रांमध्येसुद्धा बर्फवृष्टी आणि पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते असा इशारा आहे. हवामान विभागानं प्रामुख्यानं उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगालच्या काही भागांना पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवली आहे.
येत्या 24 तासांत तामिळनाडू, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश इथं पाऊस आणि काही राज्यांमध्ये सोसाट्याचे वारे वाहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 40-50 किमी असेल अशा शब्दांत यंत्रणेनं नागरिकांना सतर्क केलं आहे. पर्यटनासाठी लोकप्रिय असणाऱ्या जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्येसुद्धा पावसाचा इशारा असून, या राज्यांच्या विविध भागांमध्ये वादळी वारा आणि पाऊस वाहतुकीवर परिणाम करु शकतो, ज्यामुळं नागरिकांनी हवामानाचा अंदाज पाहून प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहन करण्यात येत आहे.