Maharashtra Weather News: केंद्रीय हवामान विभागानं देश स्तरावरील हवामानाचा अंदाज वर्तवताना देशाच्या बहुतांश भागांमध्ये उकाडा वाढला असल्याचं प्राथमिक निरीक्षण नोंदवलं. तर, देशाच्या दक्षिणेकडील राज्य मान्सूनच्या प्रतीक्षेत असल्याचंही स्पष्ट केलं. हवामान विभागाच्या माहितीनुसार नव्यानं सक्रिय होत असलेल्या एका पश्चिमी झंझावातामुळे देशातील मध्य भागात असणाऱ्या राज्यांमध्ये पुढील 24 तासांमध्ये पावसाची शक्यता असेल. महाराष्ट्रातही काहीशी अशीच परिस्थिती पाहायला मिळेल.
पूर्वमोसमी पावसासाठी राज्याच पूरक वातावरणनिर्मिती होत असून मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान प्रणाली पाहता या भागांना ऑरेंज, तर, कोकण आणि विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्राच्या मध्य क्षेत्रापासून गुजरातच्या सौराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यानं महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसासाठी चांगली वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. तर, मराठवाड्यापासून उत्तर कर्नाटक, तामिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
पुढील 24 तासांमध्ये मुंबई, ठाणे आणि पालघर भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सकाळचे काही तास वगळता दिवसभर शहरातील वातावरण अंशत: ढगाळ राहणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
मुंबईत पावसाचा इशारा देत हवामान विभागानं शहरात यादरम्यान ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारे वादणार असून, त्यामुळं वादळी परिस्थिती काहीशी अडचणीची ठरू शकते असं स्पष्ट केलं आहे. फक्त मुंबईच नव्हे, तर ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यात सुरु असणाऱ्या या पावसाच्या सत्रामुळं बहुतांशी शेतपिकांच नुकसान झालं असून, नाशिक जिल्ह्यात डाळिंब, द्राक्ष, काढून ठेवलेला कांदा सह भाजीपाला पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान. अवकाळी पावसाचे राज्यात चार बळी. यामध्ये मराठवाड्याला फटका बसला असून जनावरं दगावल्याचंही वृत्त आहे.
अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी वारे दाखल होण्यास सुरुवात झाली असून मंगळवारपर्यंत अंदमान आणि निकोबार बेटांवर मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. ज्यानंतर महाराष्ट्राच्या दिशेनं या वाऱ्यांची वाटचाल सुरू होणार असून साधारण 6 जूनपर्यंत मान्सून राज्यात दाखल होईल असं सांगण्यात आलं आहे.