उत्तर भारतावर धुळीची चादर, महाराष्ट्रात कार पाऊस-गारपिटीचा इशारा; मान्सूनआधी देशभरात हवामानाचं थरारनाट्य

Weather News : भारतीय उपखंडामध्ये सध्या सातत्यानं हवामानबदल होत असून, प्रांतानुसार हे बदल होत असल्याचं स्पष्ट होत आहे....  

सायली पाटील | Updated: May 15, 2025, 08:19 AM IST
उत्तर भारतावर धुळीची चादर, महाराष्ट्रात कार पाऊस-गारपिटीचा इशारा; मान्सूनआधी देशभरात हवामानाचं थरारनाट्य
Maharashtra Weather News hailstorm and central maharashtra to experiance storm rain pre monsoon showers in mumbai and konkan

Weather News : उत्तर भारतापासून ते अगदी दक्षिण भारतापर्यंत सर्वत्र हवामानात मोठे बदल होत असून, बहुतांशी उत्तर भारतीय राज्यांमध्ये धुळीचं वादळ आल्याचं पाहायला मिळालं. यादरम्यान वाऱ्याचा वेग इतका मोठा होता, की संपूर्ण आभाळ यामुळं झाकोळलं गेलं होतं. केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये ही स्थिती कायम राहणार असून, राजस्थानच्या वाळवंटीय भागातून आलेली ही धूळ  दिल्ली पंजाबपासून सर्व उत्तर भारतामध्ये वातावरणावर परिणाम करताना दिसणार आहे. 

महाराष्ट्राला वादळी पावसाचा इशारा.... (Maharashtra Weather News)

मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये वादळी पावसाची हजेरी असेल असा स्पष्ट इशारा हवामान विभागानं जारी केला आहे. सातारा जिल्ह्यात पाऊस आणि गारपिटीचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे. तर, पश्चिम बंगाल, रायलसीमापासून मराठवाडा, कर्नाटक आणि केरळापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यानं राज्यावर सध्या अवकाळीसह पूर्वमोसमी पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. 

कोकणात पावसाची दमदार हजेरी...

कोकणात मागील 48 तासांपासून पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती होत असून, गुरुवारी येथील बहुतांश भागांमध्ये दमदार पावसाची हजेरी असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर, राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये पुढचे पाच दिवस वादळी पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. 

मुंबईत वादळी पावसाचा अंदाज 

मागील 24 तासांमध्ये मुंबईतही आकाश अंशत: ढगाळ असल्याचं दिसून आलं तर बुधवारी सायंकाळनंतर पावसाळी ढगांनी शहरातील आकाश व्यापलं, परिणामी गुरुवारी मुंबईसह ठाणे, पालघर भागात वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

एकिकडे अवकाळी आणि पूर्वमोसमी (Monsoon) पावसासाठी राज्यात पूर्णत: पूरक वातावरणनिर्मिती होत असतानाच दुसरीकडे नैऋत्य मोसमी वारे अंदमानातून पुढे सरकत आहेत. वाऱ्यांचा एकंदर वेग पाहता पुढील दोन दिवसांत ते अरबी समुद्र, मालदीव आणि बंगालच्या उपसागराच्या दिशेनं वाटचाल करतील असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.