)
Maharashtra Weather News : केंद्रीय हवामान विभागानं देशातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांना पावसाचा इशारा दिलेला असतानाच इथं महाराष्ट्रात तर पावसाचा किंबहुना हवामानाचा काही नेम लागत नाहीये. मागील 24 तासांमध्ये राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसानं उघडीप दिलेली असताना किमान पुढील 48 तासांमध्ये पावसाची हजेरी नसेल असं म्हटलेलं असतानाच पावसाच्या वाऱ्याचा राज्याच्या काही भागांमध्ये पुन्हा प्रवेश झाला आहे.
दक्षिण मध्य महाराष्ट्प आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांमध्ये ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारे वाहणार असून काही दुर्गम भागांसह इतरही भागांमध्ये पावसाची हजेरी असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात मात्र पावसाळी ढग चकवा देताना दिसतील आणि उन्हासोत त्यांचा लपंडाव सुरू असेल अशीच काहीशी स्थिती पाहायला मिळू शकते. पावसाची मधूनच येणारी एखागी जोरदार सर वगळता कोकणातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस रजेवर गेल्याचं पाहायला मिळेल.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही कमाल तापमानात वाढ होणार असून, आकाश अंशत: ढगाळ राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शहर आणि उपनगराच्या काही क्षेत्रांमध्ये पावसाच्या तुरळक सरींचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. ठाणे आणि पालघरमध्येही पावसाचा जोर कमी झालेला असेल. मात्र तूर्तास राज्याच्या मराठवाडा भागामध्ये पावसाचा जोर तुलनेनं वाढला असल्यानं हवामान विभागानं या भागासाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांच्या माहितीनुसार '10 सप्टेंबरपासून द.ओडिशा आणि उ. किनारी आंध्र प्रदेशवर वरच्या हवेतील चक्राकार अभिसरण कायम असल्या कारणानं पुढील ४-५ दिवसांत राज्यातील अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यांसह व मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. आहे. सऱ्या दिवसापासून क्षेत्रीय प्रभाव हळूहळू वाढेल आणि काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असेल', असं त्यांनी स्पष्ट केलं.
इंडियन ओशन डायपोल हा निगेटिव्ह (मायनस) असणार असल्यानं त्याचा हवामानावर सकारात्मक परिणाम होणार आहे. परिणामी राजस्थानवाटे परतीच्या प्रवासाला निघणाऱ्या मान्सूनचा प्रवास लांबण्याची चिन्हं आहेत. ज्यामुळं ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होणार असून, यंदा दसऱ्यासह दिवाळीसुद्धा पावसातच जाणार असा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
मराठवाड्यासाठी सतर्कतेचा इशारा का देण्यात आला आहे?
मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, विशेषतः विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह. दक्षिण ओडिशा आणि उत्तर किनारी आंध्र प्रदेशवर वरच्या हवेतील चक्राकार अभिसरण (cyclonic circulation) कायम असल्याने पुढील 4-5 दिवस (10 ते 14 सप्टेंबर 2025) मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. यामुळे पाणी साचणे, पूरस्थिती आणि वाहतूक अडथळ्यांचा धोका वाढू शकतो
कोकणात पावसाची स्थिती काय असेल?
कोकणात 11 सप्टेंबर 2025 रोजी पावसाचा जोर कमी असेल. पावसाळी ढग आणि सूर्यप्रकाश यांचा लपंडाव सुरू राहील. काही ठिकाणी तुरळक जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे, पण एकंदर पाऊस रजेवर असल्यासारखी परिस्थिती असेल. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसारख्या जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे.
पावसाच्या वाढत्या जोरामागील कारण काय आहे?
हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांच्या मते, दक्षिण ओडिशा आणि उत्तर किनारी आंध्र प्रदेशवर वरच्या हवेतील चक्राकार अभिसरणामुळे आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा (low-pressure system) तयार झाल्याने महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.