चक्रीवादळाचे संकेत पाहता मुंबई, रायगडसह 'या' भागात वादळी पावसाचा इशारा; काळेकुट्ट ढग दाटून येणार आणि...

Maharashtra Weather News : हवामानाचा चिंता वाढवणारा इशारा. दुपारनंतर अचानकच होणार मोठे बदल... हा कोणत्या भागामध्ये संभाव्य संकटाचा इशारा?   

सायली पाटील | Updated: May 16, 2025, 07:29 AM IST
चक्रीवादळाचे संकेत पाहता मुंबई, रायगडसह 'या' भागात वादळी पावसाचा इशारा; काळेकुट्ट ढग दाटून येणार आणि...
Maharashtra weather news heavy rain predictions in raigad and mumbai for next few days monsoon latest update

Maharashtra Weather News : फक्त राज्यातच नव्हे, तर गेल्या 48 तासांसाठी देशातील हवामानाचा आढावा घेतल्यास बहुतांश भागांमध्ये सातत्यानं काही बदल झाल्याचं दिसून आलं. त्यातच बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या शक्ती या चक्रीवादळानं वाऱ्यांची दिशा बदलल्यानं कमीजास्त स्वरुपात त्याचा थेट परिणाम राज्यातील हवामानावरही होताना दिसत आहे. या चक्रीवादळाच्या धर्तीवर पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बांगलादेश इथं जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, महाराष्ट्राच्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मुंबई क्षेत्रावर पूर्वमोसमी वारे आणि वादळी पावसाचा प्रभाव दिसून येत आहे. 

रायगडला पावसाचा यलो अलर्ट

पुढील 48 तासांसाठी अर्थात 18 मे पर्यंत रायगड जिल्ग्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा इशारा देण्यात आला असून, यादरम्यान ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार यादरम्यान ढगांच्या गडगडाटासह वीजा चमकण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. विजा चमकत असताना घराबाहेर पडू नका, मोबाईलचा वापर टाळा, इलेक्ट्रिक उपकरणांपासून दूर रहा असा इशारा जारी करण्यात आला आहे. 

मे महिना उन्हाचा नव्हे, पावसाचा! 

मुंबई मुख्य शहर आणि उपनगरांसह बहुतांश जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. असं असतानाच भारतीय हवामान खात्याने या स्थितीच्या धर्तीवर पुढीचे किमान तीन ते चार आठवडे राजच्यात सरासरीहून अधिक पर्जन्यमान राहील असा अंदाज वर्तवला आहे. प्रत्यक्षात मान्सून राज्यात दाखल होईपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

हवामान अभ्यासकांच्या निरीक्षणानुसार राज्यात पुढचे चार दिवस पावसाचा मारा कायम राहणार असून, दरम्यानच्या काळात वाऱ्याचा वेगही अधिर असणार आहे. ज्यामुळं 15 ते 22 मे दरम्यान राज्यात पावसाचं प्रमआण अधिक असेल. 

सध्या अरबी समुद्रावरसह आणि तेलंगणा राज्यावरपर्यंत वाऱ्यांची चक्राकार गती पाहता त्यामुळं राज्यात वळवाच्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही. या पावसाचा तडाखा  सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांना बसेल, असाही अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.