Maharashtra Weather News : संपूर्ण भारतामध्ये हवामानबदलांना सुरुवात झाली असून, उत्तरेकडील (Himachal Pradehs) हिमाचल प्रदेश आणि काश्मीरसारखी (Kashmir) राज्य वगळता देशाच्या उर्वरित भागांमध्येही तापमानवाढीस सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रसुद्धा इथं अपवाद नाही. मध्य प्रदेशसह नजीकच्या भागातून उत्तर कोकणात येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे मुंबईला उष्णतेच्या लाटा तडाखा बसत आहे. मंगळवार आणि बुधवारी हीच स्थिती कायम राहून शहरातील तापमानाचा आकडा 38 ते 39 अंशांदरम्यान असल्याचं पाहायला मिळालं.
पुढील 24 तासांमध्ये मुंबईचं हेच तापमान काही प्रमाणात किंचित फरकानं घसरण्याची शक्यता वर्तवमअयात येत आहे. तर, त्यानंतर अर्थात होलिका दहनानंतर मात्र तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यातील ठाणे, पालरघरसह कोकण किनारपट्टी क्षेत्रामध्ये हवेतील दमटपणा वाढल्यानं उष्मा अधिक भासू लागला आहे. तर, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. राज्यात प्रामुख्यानं विदर्भात बहुतांश जिल्ह्यांत कमाल तापमान 40 अंशांपलिकडे पोहोचल्यानं हा उष्मा नेमका किती तापदायक आहे याचा अंदाज लावता येतोय. ही स्थिती पुढील कैक दिवस कायम राहील असंच हवामान विभागानं स्पष्ट केल्यामुळं नागरिकांच्या चिंतेत आता भर पडताना दिसणार आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यासाठी पुढील चार दिवस तुलनेनं अधिक तापदायक ठरणार असून, या दिवसात तापमानाचा आकडा 38 ते 40 अंशांपर्यंत पोहोचेल. तर विदर्भात ते हाच आकडा चाळिशीपलिकडे जाईल असा अंदाज आहे.