Maharashtra Weather News : हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार राज्यात तापमानाचा आकडा वाढत असताच एकाएकी राज्यावर पावसाळी ढगांचं सावट पाहायला मिळत आहे. तापमानवाढीमुळं बाष्पीभवनाचा वेग वाढला असून, त्याच कारणास्तव पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. सध्याच्या घडीला राज्यातील विदर्भ क्षेत्रातून उष्णतेची लाट ओसरली असून, महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये आकाश अंशत: ढगाळ राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबई शहर, उपनगर आणि राज्याच्या काही भागांमध्ये उष्णतेची लाट येऊन गेल्यानंतर आता हवामानात सातत्यानं मोठे बदल होताना दिसत आहेत. ज्यामुळं पुढील पाच दिवस मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा जारी करण्यात आला असून, ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील काही ठिकाणी विजांसह वादळी वारे वाहणार असून ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील, अशी असा स्पष्ट इशारा हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून मुंबई शहरात उष्णतेच्या लाटांचा सातत्यानं मारा होत होता. जिथं तापमान 39 अंशांच्या घरात पोहोचलं होतं. मात्र आता हाच तापमानाचा आकडा 32 अंशावर आला आहे. थोडक्यात शहरातील कमाल तापमानात घट झाली आहे. दरम्यान, उष्मा मात्र कमी न झाल्यानं यातून नागरिकांना मात्र फारसा दिलासा मिळत नाहीय.
राज्यात पुढील चार दिवस कोकण पट्टा वगळता उर्वरित महाराष्ट्रात दिवसाच्या कमाल तापमानात काही अंशांची घट अपेक्षित आहे. मात्र ही घट आता होत, असून पुन्हा जेव्हा तापमानवाढीस सुरुवात होईल तेव्हा मात्र होरपळ टाळता येणार नाही हेच स्पष्ट असल्यामुळं उकाड्याच्या या पुढच्या दिवसांचीच अधिक चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.