Maharashtra Weather News : मुंबई, महाराष्ट्रासह देशात रेकॉर्ड ब्रेक थंडी; तापमानाचा निच्चांकी आकडा पाहूनच दातखिळी बसेल
Maharashtra Weather News : मागील 9 वर्षांमध्ये जे घडलं नाही, त्याच हवामानानं सर्वांना भरलीय हुडहुडी. कधी नव्हे ती मुंबईसुद्धा गारठली. पाहा सविस्तर हवामान वृत्त आणि अंदाज एका क्लिकवर...
Maharashtra Weather News : डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पश्चिमी झंझावाताचा परिणाम आणखी वाढल्यामुळं सबंध भारतामध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. काश्मीरच्या खोऱ्यापासून हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या पर्वतीय क्षेत्रांमध्येही तापमानात घट झाली असून, उत्तर भारतातील मैदानी क्षेत्रासह देशाच्या उर्वरित राज्यांच्या दिशेनं या शीतलहरी अधिक वेगानं वाहत येत असल्यामुळं गारठा अधिक जाणवू लागला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर असणारं पावसाचं सावट आता जवळपास नाहीसं झालं असून, मुंबईतही थंडीनं पकड मजबूत केल्याचं पाहायला मिळत आहे. मागील 9 वर्षांमध्ये मुंबईतील थंडीनं न मोडलेले सर्व विक्रम सोमवार 9 डिसेंबर रोजी मोडीस निघाले. कारण, शहरातील किमान तापमानाचा आकडा 13.7 अंशांवर पोहोचला होता. 'फेंगल' चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर मुंबईसह राज्याच्या किनारपट्टी क्षेत्रामध्ये थंडीसाठी पूरक वातावरण निर्मिती होताना दिसत असून, पुढील 48 तासांसाठी हीच स्थिती कायम असणार आहे.
राज्यात धुळे शहरात 4°c निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हे यंदाच्या हंगामात सर्वाधिक कमी तापमान ठरलं असून, इथं काळाच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
उत्तर महाराष्ट्रामध्येही तापमान 10 अंशांहून कमी झालं असून, या किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळं उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढतच असून, त्याचा परिणाम उर्वरित देशात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात निफाड इथं पुन्हा एकदा पारा 6 अंशांपर्यंत पोहोचल्यामुळं ही थंडी आता मोठ्या मुक्कामाला आल्याचीच जाणीव होत आहे.
हेसुद्धा वाचा : RBI नं निराशा केल्यानंतर HDFC चा ग्राहकांना धक्का; EMI 'इतक्या' टक्क्यांनी वाढला
देशातील हवामानाचा आढावा...
राजस्थान, काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि झारखंडसह पंजाब, मध्य प्रदेश आणि पूर्वोत्तर भारतामध्येही तापमानात घट नोंदरवण्यात आली आहे. राजस्थानमध्ये पारा 3 ते 4 अंशांपर्यंत खाली आला असून, मंगळवारी तापमानात आणखी घट होण्याचा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर, हिमाचल प्रदेशमध्ये मोसमातील पहिली बर्फवृष्टी झाल्यामुळं अटारी-लेह राष्ट्रीय महामार्गासहित राज्यातील 87 रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तिथं काश्मीरच्या खोऱ्यामध्ये तापमानाचा आकडा उणे 1 अंशांहूनही कमी झाल्यामुळं इथं हाडं गोठवणारी थंडी पडल्याचं स्पष्ट होत आहे. देशातील पूर्वोत्तर भागात हलक्या पावसाच्या सरी वगळता उर्वरित देशात थंडीचाच परिणाम कायम असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.