Maharashtra Weather News : समोरचं दिसणार नाही इतका पाऊस पडणार; राज्यात पुढचे 5 दिवस नुसता धुमाकूळ!

Maharashtra Weather News : पावसाळी वातावरणाच्या तयारीनिशी घराबाहेर पडा. राज्याच्या कोणत्या भागांना पावसाचा इशारा? तुमच्या शहर- जिल्ह्यात काय स्थिती?   

सायली पाटील | Updated: May 19, 2025, 07:19 AM IST
Maharashtra Weather News : समोरचं दिसणार नाही इतका पाऊस पडणार; राज्यात पुढचे 5 दिवस नुसता धुमाकूळ!
Maharashtra weather news pre monsoon heavy rain for next five days in konkan central maharashtra mumbai know latest update

Maharashtra Weather News : मुंबई, मध्य महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यामध्ये गेल्या 24 तासांपासून पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं आहे. पश्चिम महाराष्ट्रातही ही स्थिती कायम राहणार असून, पुढील पाट दिवसांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पवासाचीच हजेरी असेल असा स्पष्ट इशारा हवामान विभागानं जारी केला आहे. 

मान्सूनच आगमनासाठी अरबी समुद्रात पूरक स्थिती निर्माण होत असतानाच देशात आता मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. तर, हा पाऊस महाराष्ट्रात मात्र आतापासूनच धुमाकूळ घालताना दिसत आहे. त्याच धर्तीवर हवामान विभागानं पुढील चार ते पाच दिवस राज्यात वादळी पावसाची हजेरी असेल असा इशारा जारी केला आहे. प्रामुख्यानं नाशिक, अहिल्यानगर, सातारा, पुणे, कोल्हापूर या भागांना वादळी पावसाचा तडाखा बसेल. तर, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण पट्टासुद्धा या पावसापासून बचाव करू शकणार नाहीय. 

मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह राज्यात जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यादरम्यान कोकणासह मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट'सुद्धा जारी करण्यात आला आहे. तर, विदर्भातही काही ठिकाणी पाऊस जोरदार बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. सध्याच्या घडीला गुजरात आणि उत्तर कोकणच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत. याच वाऱ्यांची दिशा आणि त्यांचा वेग पाहता परिणामस्वरुप सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे. हा पाऊस आणि हे पावसाळी वातावरण इतक्यात पाठ सोडणार नसून किमान 21 मे पर्यंत पावसाचा जोर वाढणार असल्याचा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 

राज्यात अवकाळी संकट... 

राज्याच्या बहुतांश भागांना सध्या अवकाळी पावसाने  झोडपून काढलं असून, ठिकठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावल्यामुळं शेतपिकं आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे. हे संकट आणखी काही दिवस टिकणार असून, हवामान विभागानं पुणे शहरासह जिल्ह्यात आणि राज्यातील घाट परिसरात पुढील दोन दिवस हलका ते मध्यम पाऊस पडेल असाही इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात सध्या पावसाचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. काही भागांमध्ये पावसाच्या सरी इतका जोर धरतील की, त्यामुळं समोरचं काही दिसणार नाही, अशी स्थितीसुद्धा निर्माण होऊ शकते. याच वादळी पावसाच्या धर्तीवर नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे.