गंभीर इशारा! विदर्भात वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी; वाऱ्यांचा वेग वाढणार, ढगांचा गडगडाट होणार...

Maharashtra Weather News : विदर्भात ऐन उन्हाळ्यात पाऊसधारा. मुंबईत मात्र सहन न होणारी होरपळ... जाणून घ्या हवामान विभागानं राज्यासाठी जारी केलेलं सविस्तर हवामान वृत्त...   

सायली पाटील | Updated: Mar 20, 2025, 08:07 AM IST
गंभीर इशारा! विदर्भात वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी; वाऱ्यांचा वेग वाढणार, ढगांचा गडगडाट होणार...
Maharashtra Weather news rain predictions in vidarbha yellow alert issued mumbai to experiance sharp sunglight

Maharashtra Weather News : देशात सध्या चार दिशांना चार वेगळ्या पद्धतीचं हवामान असताना आता या सातत्यानं होणाऱ्या बदलांचे परिणाम महाराष्ट्रावरही होताना दिसत आहेत. देशभरातील बहुतांश राज्यांमध्ये सध्या उष्मा वाढला असून, पूर्वोत्त राज्यांमध्ये मात्र पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. दक्षिण भारतातील किनारपट्टी क्षेत्रामध्ये दमट हवामानात वाढ होत असून, मध्य भारत आणि महाराष्ट्रामध्येसुद्धा एकिकडे उष्मा वाढत असतानाच दुसरीकडे मात्र पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. 

महाराष्ट्रात उच्चांकी तापमानाचा आकडा तुलनेनं कमी असला तरीही मुंबई शहर मात्र उथं अपवाद ठरताना दिसत आहे. शहराच्या बहुतांश भागांसह उपनगरीय क्षेत्रांमध्येसुद्धा सूर्याचा कहर सुरूच आहे. तर होरपळणाऱ्या विदर्भाला मात्र या स्थितीपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. विदर्भच नव्हे तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आल्यामुळं ऐन उन्हाळ्यातील या पावसाळी वातावरणानं नागरिकांच्या चिंतेत भर टाकली आहे. 

सध्याच्या घडीला गुजरातच्या उत्तरेपासून खंडीत होणाऱ्या वाऱ्यांमुळं कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. तर, मध्य महाराष्ट्र आणि नजीकच्या भागांवरही चक्राकार वारे वाहत आहेत. ज्यामुळं महाराष्ट्रात वातावरणात लक्षणीय बदल पाहायला मिळत आहेत. 

हेसुद्धा वाचा : मेट्रो स्थानकातून उतरून थेट मॉल, कॉलेजमध्ये जाता येणार, MMRDA चा नवा प्लान

महाराष्ट्रात पावसासाठी पूरक वातावरण होत असतानाच केंद्रीय हवामानशास्त्र विभागानं पूर्व मध्य भारत, उत्तर पूर्व भारत आणि अरुणाचल प्रगेशात 23 मार्च रोजी ढगांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवत 20 ते 23 मार्चदरम्यान या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील चार ते पाच दिवसांमध्ये उत्तर पश्चिम भारतामध्ये कमाल तापमान 3 ते 5 अंशांनी वाढणार असल्याचा इशारा आयएमडीनं जारी केला आहे. याव्यतिरिक्त देशातील हवामानात कोणतेही लक्षणीय बदल होणार नसल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.