Maharashtra Weather News : हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानंतर आणि जारी करण्यात आलेल्या पावसाच्या यलो अलर्टनंतर एकंदरच हवामानाचे तालरंग बदलले आणि एकाएकी पश्चिम महाराष्ट्राला पावसानं झोडपलं. तिथं सूर्य आग ओकत असतानाच अनपेक्षितपणे आलेल्या या पावसानं राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये क्षणार्धात सारं चित्र बदललं. (Unseasonla Rain)
सिंधुदुर्गापासून गोवा (Konkan, Goa) आणि तिथं मिरज, सांगली भागातही अवकाळीचा तडाखा बसला. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटात आलेल्या या पावसानं जनजीवन विस्कतळीत झालं. सांगली शहरामध्ये वीजपुरवठासुद्धा खंडित झाला आणि सामान्यांची त्रेधातिरपीट उडाली. मान्सूनच्या (Monsoon) पावसात होते अगदी तिच अवस्था इथं पाहायला मिळाली आणि कोल्हापूरसुद्धा इथं अपवाद ठरलं नाही. अवकाळीच्या येण्यानं उकाडा काही अंशी कमी झाला असला तरीही बागायतदारांच्या अडचणी वाढल्या असून, या पावसानंतर वाढणाऱ्या उकाड्याच्या विचारानंच अनेकांना घाम फुटण्यास सुरुवात झाली आहे.
राज्यात पुढील 24 तासांमध्ये अवकाळीच्या या स्थितीत काही अंशी सुधारणा होणार असून, महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे मात्र ढगाळ वातावरण कायम असेल. शनिवारपासून राज्यात पुन्हा अवकाळीसाठी पूरक वातावरनिर्मिती होणार असून त्यामुळं सांगली, सोलापूर इथं पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र वगळता राज्याच्या उर्वरित भागांमध्ये मात्र सूर्याचा दाह कायम राहणार असून, त्यात काही अंशांची वाढसुद्धा होणार आहे.
सध्याच्या घडीला छत्तीसगढपासून सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा कर्नाटकच्या अंतर्गत भागासह तामिळनाडूच्या दक्षिणेकडेही परिणाम करताना दिसत आहे. ज्यामुळं विदर्भात बहुतांश क्षेत्रांमध्ये तापमान 38 ते 39 अंशांपलिकडे पोहोचलं आहे. उत्तर महाराष्ट्रातही तापमानवाढीस सुरुवात झाली आहे. तर, इथं मुंबई, ठाणे, पालघर भागांमध्येही उष्मा वाढत असल्यामुळं नागरिकांच्या आरोग्यावर या उकाड्याचा परिणाम होताना दिसत आहे. राज्यात मागील 12 तासांमध्ये हवामानात झालेल्या बदलांचा परिणाम पुढील 24 तासांमधील हवामानावर होणार असल्यामुळं कमाल आणि किमान तापमानामध्ये मोठी तफावत दिसून आल्यास आश्चर्याची बाब नसावी हेच आता स्पष्ट होत आहे.
देशभरातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाल्यास बहुतांश भागांमध्ये उकाडा प्रचंड वाढला असून, मान्सूनपूर्व उष्णतेचा हा स्तर सध्या प्राथमिक स्थिती असून, एप्रिल आणि मे महिन्यात तो आणखी तीव्र होण्याचा अंदाज केंद्रीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. तर, जम्मू काश्मीर आणि लडाख प्रांतात नव्यानं एक पश्चिमी झंझावात सक्रिय असून या भागांमध्ये स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं हिमवृष्टीचा इशारा जारी केला आहे. देशाच्या दक्षिणेकडे केरळ, तामिळनाडू, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेट समूह या भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज आयएमडीनं वर्तवला आहे.