सुट्टीवर गेलेला पाऊस परतण्यास मुहूर्त सापडला; विदर्भाची मात्र उकाड्यापासून सुटका नाहीच

Maharashtra Weather News : मान्सून पुन्हा सक्रिय होणार, पण कधी आणि कुठे? विदर्भातील हवामानानं वाढवली चिंता... जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त...

सायली पाटील | Updated: Jun 12, 2025, 07:14 AM IST
सुट्टीवर गेलेला पाऊस परतण्यास मुहूर्त सापडला; विदर्भाची मात्र उकाड्यापासून सुटका नाहीच
Maharashtra weather news Vidarbha to face heatwave monsoon to get active soon

Maharashtra Weather News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात विश्रांती घेतलेल्या, मोठ्या सुट्टीवर गेलेल्या मान्सूननं आता पुन्हा एकदा आपला मोर्चा महाराष्ट्रातील बहुतांश भागांकडे वळवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं मान्सूनच्या परतण्यास खऱ्या अर्थानं मुहूर्त सापडला असं म्हणणं गैर ठरणार नाही. दरम्यानच्या काळात राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्यासाठी पूरक वातावरणनिर्मिती होत असतानाच विदर्भात मात्र होरपळ थांबलेली नाही.

विदर्भाच्या काही भागांमध्ये तापमान 40 अंशांपलिकडे गेल्यानं पावसाळ्यातील या तापमानवाढीनं अनेकांचीच होरपळ होत आहे. तर, याच विदर्भाच्या काही भागांमध्ये मात्र जोरदार पावसाची हजेरी असेल असाही इशारा हवामान विभागानं जारी केला आहे. ज्या धर्तीवर दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भाच्या काही भागांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गुरुवारसाठी विदर्भात नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया अमरावती, आणि अकोला या जिल्ह्यात  ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर बुलढाणा,वाशिम, यवतमाळ  आणि वर्धा येथे एलो अलर्ट देण्यात आला आहे.

कुठे जारी करण्यात आला ऑरेंज अलर्ट?

हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 48 तासांमध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुण्यात या पावसाच्या धर्तीवर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 14 जून नंतर राज्यात सर्वत्र पाऊस सक्रिय होण्यास पूरक वातावरणनिर्मिती होणार असल्याची माहिती हवामान शास्त्रज्ञ एस.डी.सानप यांनी दिली.

मागील काही दिवसांपासून राज्यातील काही भागात पावसाची उघडीप पाहायला मिळत असली तरीही येत्या 4 ते 5 दिवसांचा अंदाज पाहता पुढच्या 48 तासांसाठी राज्याच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळेल. कोकणातील दक्षिण भागाला पावसाचा जोरदार मारा सहन करावा लागणार आहे. तर, 15 जूननंतर राज्यभरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच पाऊस आणि घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

मान्सून पुन्हा सक्रिय होतोय...

मान्सूनचे वारे पुन्हा सक्रिय होत असून 13 ते 14 जूननंतर त्याची तीव्रता आणखी वाढणार आहे. तर, बंगालच्या उपसागरात एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होत असल्यामुळं मान्सूनचे वारे राज्यात पुन्हा बरसण्यास सज्ज होत आहेत. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे राज्यात अद्यापही मान्सून पूर्णपणे सक्रिय झालेला नसतानाच हे वारे विश्रांतीवर गेले. मात्र 13 ते 19 जूनदरम्यान हे वारे राज्याच्या बहुतांश भागांपर्यंत मजल मारण्यास हवामानाची स्थिती पोषक असल्याचंही हवामान शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं.