महाराष्ट्रात मान्सूनने जोर धरला, अनेक भागांत ढगफुटीसदृश्य पाऊस, 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट, मुंबईत हवामानाची स्थिती काय?

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. आज दोन जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 15, 2025, 07:43 AM IST
महाराष्ट्रात मान्सूनने जोर धरला, अनेक भागांत ढगफुटीसदृश्य पाऊस, 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट, मुंबईत हवामानाची स्थिती काय?
Maharashtra weather Update light to moderate rainfall gusty winds in ratnagiri and raigad

Maharashtra Weather Update: ब्रेक घेतलेल्या मान्सूनचा आता जोर वाढला आहे. मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. तर शनिवारी झालेल्या पावसामुळं राज्यात 9 जणांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. तर आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईतही विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रासह राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस बरसणार आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहणार आहे. अरबी समुद्रापासून आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. या मुळं राज्यात पावसाचा पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळं पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने रविवारी रत्नागिरीला तर सोमवारी सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर कोकणातील उर्वरित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून आणि मुंबईला यलो अलर्ट आहे.

पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, मुंबई जळगाव, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

रायगडसाठी आज रेड अलर्ट

रायगड जिल्ह्यात सर्वच भागात पावसाची रिपरिप सुरू आहे. हवामान खात्याने आजच्या साठी जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिलाय. त्यामुळे जिल्हा प्रशासनानं सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. शनिवारी संध्याकाळपासूनच जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. अलिबागसह महाड , पोलादपूर, माणगाव , भागात पाऊस झाल्याचं वृत्त आहे.  आज सकाळ पासून सर्वत्र दाट ढगाळ वातावरण असून पावसाची रिप रिप सुरू आहे.

वीज पडून 9 जणांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वीज पडून दोन सख्ख्या भावांसह चारजणांचा मृत्यू झाला असून 7 जण भाजले आहेत. यश राजू काकडे, रोहित राजू काकडे, रंजना बापूराव शिंदे व शिवराज सतीश गव्हाणे अशी मयतांची नावे आहेत. परभणी जिल्ह्यातील पिंप्राळा येथे वीज पडून माणिक महादराव मिरासे  यांचा मृत्यू झाला. धुळे जिल्ह्यातील ताजापुरी नथ्थू हरचंद सनेर तर जळगाव जिल्ह्यात मोहित जगतसिंग पाटील  व शांताराम शंकर कठोरे यांचा मृत्यू झाला. तुरखेड (जि. अमरावती) येथील पवन कोल्हे हा मरण पावला आहे.