Maharashtra weather Update : पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलेला असतानाच आता आयएमडीच्या या इशाऱ्याचे परिणाम थेट महाराष्ट्रापर्यंत दिसून येत आहेत. किंबहुना सध्या देशाच्या प्रत्येक राज्यात वेगवेगळं हवामान पाहायला मिळत असून, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतच्या हवामानबदलांचे हे परिणाम असल्याचं म्हटलं जात आहे.
देशात सध्या मध्य प्रदेशच्या नैऋत्य भागातून नजीकच्या परिसरामध्ये चक्राकार गतीनं वारे वाहत आहेत. ज्यामुळं तामिळनाडूपर्यंत या वाऱ्यांचा प्रभाव दिसत असून हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राहिला मुद्दा महाराष्ट्रातील पावसाचा, तर बंगालच्या उपसागराच्या केंद्रापासून बाहेरच्या दिशेनं वारे येत असल्या कारणानं मध्य- पूर्व भारतात वाऱ्यांच्या एकिकरणाच्या प्रक्रियेमुळं महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे.
राज्यात पावसासाठी वातावरणनिर्मिती होत असली तरीही उन्हाच्या झळा मात्र काही जिल्ह्यांमध्ये दिवसागणिक आणखी तीव्र होत आहेत. तर, तिथं विदर्भ भागामध्ये गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. इथं पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात हलक्या पाऊसधारांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र, मुंबई शहर आणि उपनगर मात्र या स्थितीत अपवाद ठरणार असून या भागांमध्ये उष्मा वाढताना दिसेल असा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतीय भागामध्ये सध्या पश्चिमी झंझावात सक्रिय असून, त्यामुळं मैदानी भागांमध्ये सातत्यानं तापमानवाढ नोंदवण्यात येत आहे. तर, खासगी हवामान संस्था स्कायमेटच्या माहितीनुसार गेल्या तीन दिवसांपासून देशात सरासरी 4 अंशांनी तापमानवाढ होत आहे. पुढील काही दिवसही हीच स्थिती कायमच राहणार असून, कमाल तापमानाचा आकडा 37 अंश सेल्सिअस इतका राहणार असून मार्च महिन्यातच देशात पावसाची शक्यतासुद्धा वर्तवण्यात आली आहे.