Maharashtra Weather News : हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मागील 24 तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं हजेरी लावली. त्यातच आता पुढील काही दिवस हे पावसाळी वातावरण कायम राहणार असल्याचा स्पष्ट इशारा हवामान विभागानं जारी केला असून, भर दिवसा आकाळात काळेकुट्ट पावसाळी ढग दाटून येणार असल्याचा इशारासुद्धा देण्यात आला आहे.
मान्सूनच्य आगमनासाठी राज्यातील नागरिकांनी चातकासारखी वाट पाहण्यास सुरूवात केलेली असतनाच मान्सूनपूर्व आणि अवकाळी अशा पावसानं विदर्भासह मराठवाडा आणि कोकणालाही झोडपलं आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं येणाऱ्या पावसाळ्यासाठीची ही पूर्वतयारी आहे असं म्हणायला हरकत नाही.
हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात मान्सूनपूर्व पाऊस सक्रिय झाला असून पुढील चार दिवस या हवामान प्रणालीच्या धर्तीवर राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, अहिल्यानगरला ऑरेंज अलर्ट उर्वरीत महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणासह राज्याच्या घाटमाथ्यावर वादळी पावसाचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे. त्यामुळं नागरिकांनी या उन्हाळी आणि पावसाळी वातावरणात आरोग्यही जपण्याचं आवाहन यंत्रणांनी केलं आहे.
सोमवारी रात्री पुण्यात साधारण तासभर झालेल्या पावसाने पुण्यातील चार ठिकाणी पाणी तुंबलं. विमानतळ, कात्रज, हडपसर, धानोरी या भागांमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, पुढील 24 तासांसाठीसुद्धा पुणे शहरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने नागरिकांना या धर्तीवर सतर्कतेचं राहण्याचे आवाहन केलं असून विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरींची शक्यता वर्तवली आहे. अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाल्याचंही निदर्शनास आलं आहे.
राज्यातील संभाजीनगर, मराठवाडा यासह धुळ्यातही अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. इथं वीज पडल्याने, एका बैल जोडीचा मृत्यू झाला, तर पावसामुळे गुरांच्या चाऱ्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे आता नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.