31 मार्च शेवटची तारीख; पोस्ट ऑफिसची तगडे रिटर्न्स देणारी 'ही' योजना होणार बंद!

MSSC Scheme: महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) योजनेतील गुंतवणुकीचा कालावधी सरकारने अद्याप वाढवलेला नाही. 

Pravin Dabholkar | Updated: Mar 15, 2025, 03:05 PM IST
31 मार्च शेवटची तारीख; पोस्ट ऑफिसची तगडे रिटर्न्स देणारी 'ही' योजना होणार बंद!
महिला सन्मान योजना

MSSC Scheme: कमी कालावधीत जास्त नफा कसा मिळेल, अशी गुंतवणूक प्रत्येकजण शोधत असतो. महिलांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये अनेक योजना आहेत. यापैकी एक योजना महिलांमध्ये प्रसिद्ध आहे. 
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) योजनेचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे यात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. तुम्हालादेखील या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे फार कमी वेळ शिल्लक आहे. 

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) योजनेतील गुंतवणुकीचा कालावधी सरकारने अद्याप वाढवलेला नाही. पोस्ट ऑफिस अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या महिलांसाठी या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2025 ही आहे. ज्या महिलांनी अद्याप या योजनेत गुंतवणूक केली नसेल त्यांच्याकडे मार्च 2025 पर्यंतचा वेळ आहे. यानंतर ही योजना बंद होऊ शकते. किंवा सरकारकडून योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो.

महिलांना गुंतवणूकीचा चांगला पर्याय 

भारत सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत 31 मार्च 2023 रोजी महिला आणि मुलींसाठी एमएसएससी योजना सुरू केली. ती 2 वर्षांच्या कालावधीसाठी राबविण्यात आली. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना आर्थिक स्वातंत्र्य देणे या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत 2 वर्षांचा मॅच्योरिटी परियडदेखील देण्यात आलाय.

किती व्याज मिळते?

देशातील कोणतीही महिला या योजनेत 2 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकते. या योजनेअंतर्गत भरघोस व्याजदरदेखील दिला जातो. एमएसएससी योजनेवर 7.5% वार्षिक व्याज दिले जाते. जे बँकांच्या 2 वर्षांच्या एफडीपेक्षा जास्त आहे. सरकारच्या माध्यमातून चालवली जात असल्याने ही एक सुरक्षित योजना मानली जाते. पोस्ट ऑफिस किंवा नोंदणीकृत बँकांमध्ये खाते सहजपणे उघडता येते.

तुम्ही किती गुंतवणूक करू शकता?

या योजनेअंतर्गत भारतातील रहिवासी असलेली कोणतीही महिला किमान 1 हजार रुपये आणि जास्तीत जास्त 2 लाख रुपये गुंतवू शकते. 2 वर्षांच्या कालावधीनंतर संपूर्ण मुद्दल आणि व्याज परत केले जाते. 1 वर्षानंतर खातेधारक 40% पर्यंत रक्कम काढू शकतात.

महिला सन्मान योजनेच्या अटी

गंभीर आजार किंवा खातेधारकाचा मृत्यू यासारख्या परिस्थितीत खाते अकाली बंद केले जाऊ शकते. जर खातेदाराने 6 महिन्यांनंतर खाते बंद केले तर व्याजदर कमी होऊ शकतो.

शेवटची तारीख 

एमएसएससी योजनेला मुदतवाढ देण्यासंदर्भात सरकारने कोणतीही घोषणा केलेली नाही. 31 मार्च 2025 पर्यंत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. महिलांसाठी हा एक सुरक्षित आणि जास्त व्याज देणाऱ्या गुंतवणुकीचा पर्याय आहे.