दुधात भेसळ करणाऱ्यांवर मकोका लावणार? महाराष्ट्र सरकार कायद्यात मोठा बदल करणार?

दुधात भेसळ करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाईसाठी कायद्यात सुधारणा करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. दुधातील  भेसळ रोखण्यासाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. 

वनिता कांबळे | Updated: Mar 26, 2025, 10:11 PM IST
 दुधात भेसळ करणाऱ्यांवर मकोका लावणार? महाराष्ट्र सरकार कायद्यात मोठा बदल करणार?

MCOCA Act On Milk adulteration : दूध आणि तत्सम अन्नपदार्थात होणारी भेसळ ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. हे खपवून घेतले जाणार नाही. दूध आणि तत्सम अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कडक कारवाई करण्यासाठी सध्याच्या कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील. त्यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा, असे निर्देश  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिले.

ॲनालॉग चीज हा पदार्थ राज्यात अनेक ठिकाणी ॲनालॉग पनीर या नावाने विक्री होत असल्याबाबत तसेच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे उघडकीस आलेल्या दूध भेसळीसंदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचनेवर झालेल्या चर्चेच्या वेळी दिलेल्या आश्वासनानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

दुध भेसळ करणाऱ्यांना तीन वर्षांपर्यंतची शिक्षा करणारा कायदा लवकरच करण्याबाबतची घोषणा यापूर्वी देखील विधानसभेत करण्यात आली होती.  सध्या दुधात भेसळ करणाऱ्यांना सहा महिन्यांची शिक्षा आहे. मात्र सहा महिन्यांची शिक्षा असल्याने याप्रकरणात लगेच जामीन होतो. ही शिक्षा तीन वर्षांपर्यंत वाढवली तर आरोपीला जामीन होणार नाही. त्यामुळे तीन वर्षांची तरतुद असणारा कायदा करण्याची मागणी करण्यात आली होती.