मध्यपुर्वेतील युद्धाचा विश्वव्यापी परिणाम; जलवाहतूकही ठप्प... मुंबईच्या बंदरावर अडकले हजारो कंटेनर

Middle East Conflict:  मध्यपूर्वेतील देशामधील तणवाचा विश्वव्यापी परिणाम पहायला मिळत आहे. अशात मुंबईजवळील जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (JNPA) येथे निर्यातीसाठी सज्ज ठेवलेले कांदा, केळी, द्राक्षे आणि इतर फळभाज्यांचे जवळपास हजारो कंटेनर थांबून राहिले आहेत. सविस्तर जाणून घ्या

प्रिती वेद | Updated: Mar 2, 2026, 03:16 PM IST
मध्यपुर्वेतील युद्धाचा विश्वव्यापी परिणाम; जलवाहतूकही ठप्प... मुंबईच्या बंदरावर अडकले हजारो कंटेनर
(photo Credit- Social Media)

Middle East Conflict: मध्यपूर्वेतील युद्धाचे अनेक देशावर परिणाम होताना दिसत आहे. उद्योगांपासून तर शेआर मार्कट, आयात निर्यातीपर्यंत सगळ्याच गोष्टींवर याचा परिणाम दिसत आहे. उरण परिसरातील व्यापारावर आखाती संघर्षाची सावली पडू लागली आहे. मुंबईजवळील जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (JNPA) येथे निर्यातीसाठी सज्ज ठेवलेले कांदा, केळी, द्राक्षे आणि इतर फळभाज्यांचे जवळपास 1,000 कंटेनर थांबून राहिले आहेत. गेल्या काही दिवसांत सागरी मार्गावरील तणाव वाढल्याने शिपिंग कंपन्यांनी आखातातील देशांकडे माल पाठवण्याबाबत सावध भूमिका घेतली आहे. या घडामोडींमुळे कृषी व्यापार साखळीवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Add Zee News as a Preferred Source

बंदरात वाढलेली अडचण

शनिवारपासून निर्यातीचा वेग मंदावला आहे. आखाती देशांमध्ये पाठवण्यासाठी तयार असलेला शेतमाल कंटेनरमध्ये भरून तयार होता; मात्र जहाजांची हालचाल अनिश्चित झाल्याने तो बंदरातच थांबला. व्यापाऱ्यांच्या मते, आयात-निर्यात व्यवहारावर सुमारे 60 टक्के परिणाम झाल्याची शक्यता आहे. निर्यातदार राहुल पवार म्हणाले, 'आयात निर्यातीवर 60 टक्के परिणाम झाला आहे.' त्यांच्या मते, शिपिंग कंपन्या पुढे येत नसल्याने मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे.

शिपिंग कंपन्यांची सावध भूमिका

मध्यपूर्वेकडे जाणाऱ्या जहाजांवर हल्ल्याचा धोका वाढल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी तात्पुरती सेवा रोखली आहे. काही जहाजांना मार्ग बदलण्याचे, तर काहींना परत फिरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जेएनपीएतून दर आठवड्याला साधारण 54 मालवाहू जहाजांची ये-जा होते. मात्र सध्याच्या परिस्थितीत ही गती कमी झाली आहे. बंदर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, युद्धस्थितीचा संपूर्ण परिणाम दिसण्यासाठी काही दिवस लागू शकतात.

आखाती बाजारपेठेवर परिणाम

इराक, सौदी अरेबिया आणि कतार यांसारख्या देशांकडे मोठ्या प्रमाणावर भारतीय फळे व भाजीपाला निर्यात होतो. सध्याच्या तणावामुळे या बाजारपेठांमध्ये पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम शेतकरी, निर्यातदार आणि वाहतूक व्यवसायावर होत आहे. कंटेनरमध्ये साठवलेला नाशवंत माल जास्त काळ थांबल्यास तो खराब होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा: Explained: काय आहे Strait of Hormuz? बंद राहिल्यास भारत-चीनसह जगाचं किती होईल नुकसान?

सरकारकडून सूचना

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे भारत सरकारच्या दूतावासाने त्या भागात राहणाऱ्या भारतीयांसाठी सुरक्षा मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राज्य सरकारनेही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे. परिस्थिती पुढे कशी बदलते, याकडे आता संपूर्ण व्यापार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

About the Author

Priti Ved

प्रिती अतुल वेद या राजकारण, लाईफस्टाईल तसेच विविध घडामोडींवर लेखन करतात. मनोरंजन आणि फिचर स्टोरीजमध्ये त्यांना विशेष रुची आहे. आध्यात्मिक पुस्तकांविषयी माहिती असून इतर धार्मिक ग्रंथांचे वाचन करायला आवडते. त्यांनी पत्रकारितेत पदवी शिक्षण घेतलं असून के. जे. जोशी महाविद्यालयात त्या पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत.  ...Read More