पुणे : पाणीपुरवठा विभागाची टाकी ओव्हरफ्लो झाल्याने पुण्यात हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. टाकीतून ओसंडून वाहणाऱ्या पाण्यामुळे पर्वती जलकेंद्राचा परिसर जलमय झाला होता. पालिकेच्या गलथान कारभारामुळे पुण्याच्या वाट्याचे लाखो लीटर पाणी वाया गेले आहे. यामुळे पुणेकरांना आता पुन्हा एकदा पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. सिंहगड रस्त्याच्या वरच्या बाजूल जलशुद्धीकरण केंद्र आहे. यातून नियमितपणे पाण्याची गळती होते. पण आज हे पाणी रस्त्यावर आल्याने ही बाब सर्वांसमोर आली आहे. पालिका प्रशासन आणि जलसंपदा विभाग जरी याला तांत्रिक बाब म्हणत असली तरी आजच्या या प्रकारची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याची पुणेकरांची मागणी आहे.


पालिकेचा गलथानपणा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाहते येणारे पाणी सिंहगड रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूकीवर याचा परिणाम पाहायला मिळाला.  वाहतूक काहीकाळ थांबल्याने ट्रॅफिकची समस्या उद्भवली. अग्निशमन विभाग आणि पालिकेने वेळीच हस्तक्षेप केल्याने पुणेकरांचा रस्ता मोकळा झाला. आधीच पुण्यावर पाणी संकट आहे. पुणेकरांवर पाणीकपात लादली जात आहे. असे असताना पाण्याची अशाप्रकारे नासाडी सुरु असल्याने संताप व्यक्त होत आहे. महापालिका कर्मचाऱ्यांचा गलथानपणा यासाठी कारणीभूत आहे. तांत्रिक बाबींमुळे हा गोंधळ झाला आहे पण तातडीने यावर उपाययोजना केल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी 'झी 24 तास'ला सांगितले.


नेमकं काय झालं ?


बंद पाईपलाईनमधून रॉ वॉटर येत असताना खराब झालेल्या पाईच्या वॉलमुळे पाणी बाहेर आलं. पाईपचा वॉल बंद करताना तांत्रिक अडचणी आल्या आणि तो बंद झाला नाही. या मधल्या वेळात लाखो लीटर पाणी वाया गेले. हा वॉल बंद करण्यात बराच वेळ गेला. गटार लाईनमध्ये प्लास्टिक पिशव्या साचल्याने पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागला.