)
Manikrao Kokate Dubai Visit: सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. पश्चिम महाराष्ट्र आणि विशेषतः सोलापूर जिल्ह्यात पुरामुळं मोठं नुकसान झालंय आहे. लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. काढणीला आलेले पिकं मातीमोल झालं. राज्यातील शेतकरी उद्ध्व्स्त झाला असताना क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे परदेश दौ-यावर असल्याचे समोर आले आहे. तसंच, या दौऱ्याचा खर्च सरकारी तिजोरीत होणार आहे.
अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर शेती बाधित झाल्याने शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त झालेले असताना, क्रीडा संकुलांचा अभ्यास करण्यासाठी राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण खात्याचे मंत्री माणिकराव कोकाटे अधिकाऱ्यांसह दुबई तसेच कतारच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. क्रीडामंत्र्यांच्या या दौऱ्याबाबत गुप्ततादेखील बाळगण्यात आली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या दौऱ्यासाठी जो काही खर्च येणार आहे तो पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या सोयीसुविधांच्या वापरापोटी जमा होणाऱ्या निधीतून भागविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या संदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून काढण्यात आला असला तरी तो राज्य सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला नाही.
क्रीडामंत्र्यांच्या या दौऱ्याबाबत क्रीडा खात्याकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. त्यामुळे या दौऱ्याच्या वेळेवर आणि नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकारच्या संकेतस्थळावर 8 तारखेला विविध विभागांचे 106 शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आले आहेत. मात्र, त्यात हा निर्णय दिसून येत नाही. अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचे कंबरड मोडलं असताना शेतकरी संकटात असताना परदेश दौऱ्याचा खर्च कशासाठी? असा सवाल उपस्थित होत आहे.
सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता. नेहमी दुष्काळग्रस्त भाग असलेल्या मराठवाड्याच तिप्पट अधिक पाऊस झाला. सोलापूरच्या सीना नदीला आलेल्या पुरामुळं संपूर्ण जिल्हा पुराच्या पाण्याखाली गेला होता. पुरामुळं शेकडो घरांचे नुकसान झाले होते. तर, लाखो हेक्टर शेतजमिन पाण्याखाली गेली होती. त्यामुळं शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या घास हिरावला गेला. त्यामुळं शेतकरी हतबल झाला होता.