Raj Thackeray Reacts On Nasarapur Rape Case: "या आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हालहाल करत संपवावं," असं राज यांनी म्हटलं आहे.

Raj Thackeray Reacts On Nasarapur Rape Case: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूरमधील चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याच्या प्रकरणावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे. राज यांनी या प्रकरणावरुन अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 'या आरोपीला संपवावं' असा सल्ला देतानाच राज यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांना थेट सवाल विचारला आहे.
"पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून, त्या नराधमाने पुढे तिला ठार मारलं आणि तिचा मृतदेह लपवायचा प्रयत्न केला. या घटनेने शब्दशः मनाचा थरकाप उडाला आणि भयानक चीड आली. या आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हालहाल करत संपवावं," असं राज यांनी म्हटलं आहे.
नक्की वाचा >>
"सरकार अशा घटनांमध्ये जेव्हा फास्टटट्रॅक पद्धतीने कारवाई करू म्हणतं तेव्हा सरकारने फास्टट्रॅकची व्याख्या पण सांगावी. कारण अशा घटना घडल्यानंतरच सरकारला जाग येते. महाराष्ट्रात मुली, स्त्रिया पळवून नेण्याचं, त्यांचं शोषण करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. आणि असं नाहीये ते एखाद्या वर्षीच वाढत आहे, तर ते वर्षागणिक वाढत आहे, याचा अर्थ कायद्याचा धाक अजिबात उरलेला नाही. त्यात या घटनेनंतर नसरापूर परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्या गेल्याच्या बातम्या पण आल्या. ही तत्परता स्त्रियांचं, मुलींचं शोषण करणाऱ्यांच्या विरोधात सरकार का दाखवत नाही?" असा थेट सवाल राज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला विचारला आहे.
नक्की वाचा >>
"या आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजे आणि ती होईलच पण अशा घटना वारंवार का घडत आहेत? ज्या महाराष्ट्राने देशाच्या स्त्री शिक्षणाचा, स्त्री सक्षमीकरणाचा पाया घातला त्या महाराष्ट्रात अशा घटना वारंवार का घडत आहेत याचा थोडा सर्वांगीण विचार व्हायला हवा की नको? अशी घटना घडली की जनतेच्या मनातला रोष उमटतो, सरकार मग कुठलंही असो त्यांचा कोडगेपणा दिसून येतो. दोनचार दिवसांत हे सगळं विसरलं जातं, पण यावर काहीतरी मूलभूत विचार आणि कृती करावी लागेल यावर आपण कधी बोलणार आहोत का?" असा सवाल राज यांनी सर्वांनाच विचारला आहे.