फडणवीस, अडवाणी, A.R रेहमान ते श्रीकांत ठाकरे... राज ठाकरेंचं भाषण जसंच्या तसं; A to Z मुद्दे

Raj Thackeray Read Full Speech A to Z Pointers: राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीमध्ये मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या सर्वच मुद्द्यांचा समाचार घेतला. ते नेमकं काय म्हणाले जाणून घ्या...

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 5, 2025, 03:05 PM IST
फडणवीस, अडवाणी, A.R रेहमान ते श्रीकांत ठाकरे... राज ठाकरेंचं भाषण जसंच्या तसं; A to Z मुद्दे
राज ठाकरेंची चौफेर फटकेबाजी

Raj Thackeray Read Full Speech A to Z Pointers: हिंदी विषयाचा इयत्ता पहिलीपासून शालेय शिक्षणामध्ये समावेश करण्याचा शासन निर्णय राज्य सरकारला विरोधकांच्या रेट्यामुळे मागे घ्यावा लागला. मात्र या शासन निर्णयाला विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं 5 जुलै रोजी मोर्चाची हाक दिली होती. हा शासन निर्णय मागे घेतल्यानंतर आज राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्रितपणे विजयी मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये हिंदीविरोधी भूमिकेपासून ते हिंदीवरुन होणाऱ्या वादापर्यंत आणि ठाकरेंची पोरं हिंदीत शिकली टीकेपासून ते मराठीचा पुळकापर्यंतच्या आरोपांना थेट उत्तर दिलं आहे. राज ठाकरे आपल्या भाषणा नेमकं काय म्हणाले ते पाहूयात अगदी सविस्तरपणे. राज यांच्या आजच्या भाषणातील मुद्दे अगदी जसेच्या-तसे...

सन्माननिय उद्धव ठाकरे!

जमलेल्या माझ्या तमाम बंधू, भगिनींनो आणि मातांनो... खरं तर दोघांची भाषणं संपली ना एकत्र आरोळ्या ठोका! खरं तर आज मोर्चा निघाला पाहिजे होता. मराठी माणूस कसा सर्व बाजूंनी एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणात उभं राहिलं असतं. पण नुसत्या मोर्च्याच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. 

आजचा मेळावा शिवर्तीर्थावर मैदानावर व्हायला हवा होता. पाऊस असल्याने अशाप्रकारची जागा मिळत नाही. बाहेर उभ्या असलेल्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आता स्क्रीनवर उरका.

मी मुलाखतीत म्हटलेलं, 'कोणत्याही वादापेक्षा, कुठल्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे.' आज जवळपास मी आणि उद्धव 20 वर्षानंतर एका व्यासपीठावर येत आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही. अनेकांना जमलं नाही आम्हाला एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं.

सगळ्या चॅनेलचे कॅमेरे इकडे लागलेत तिकडे लागले. काय वाटतं काय दोघांची बॉडी लाँगवेज कशी होती. कोण कमी हसलं, जास्त हसलं. मूळ विषय सोडून इतर विषयांमध्ये जास्त रस असतो.

मराठी हाच अजेंडा

कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा! हे मी आधीच स्पष्ट केलं होतं.

माझ्या मराठीकडे, महाराष्ट्राकडे वेड्यावाडक्या नजरेनं कोणी पाहायचं नाही.

खरं तर हा प्रश्न अनठायी होता. काही गरजच नव्हती. अचानक हिंदीचं आलं कुठून कळलं नाही मला. हिंदी कशासाठी? कोणासाठी हिंदी? लहान मुलांवर जबरदस्ती करताय. कोणाला काही विचारायचं नाही. आमची सत्ता, बहुमत आम्ही लादणार.

तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात! आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर. एक पत्र लिहिलं, दोन पत्र लिहिली. नंतर ते दादा भुसे माझ्याकडे आले. आम्ही काय म्हणतोय एवढं समजून तर घ्या. एवढं काय म्हणतोय ऐकून तर घ्या. तुम्ही सांगताय ते ऐकून घेईन पण ऐकणार नाही. मराठीच्या विषयात तुम्ही तिसरी भाषा लादत आहात. कुठलं त्रिभाषा सूत्र जेव्हा आलं ते केवळ सेंट्रल गव्हर्मेंट आणि राज्य सरकारमधील संवादासाठी आणलं.

कोर्टात सगळ्या गोष्टी इंग्रजीत होतात. केंद्रातच्या शिक्षण धोरणात, इतर राज्यातही नाही. महाराष्ट्रात प्रयोग करुन पाहिला. दक्षिणेतली राज्य यांना विचारत नाहीत. महाराष्ट्र पेटून उठतो तेव्हा काय घडतं हे राज्यकर्त्यांना समजलं असेल. त्याशिवाय का माघार घेतली.

हिंदीत राज्य संभाळता आली नाही, विकास नाही करता आला.

विनाकारण आणण्याचा विषय होता. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश कोणती तिसरी भाषा आणणार आहात? खरं तर आणली पाहिजे. गंमत बघा, हिंदी भाषिक राज्य आर्थिक दृष्ट्‍या मागास. हिंदी न बोलणारी राज्य मागास वरुन आम्ही हिंदी शिकायचं. यांना हिंदीत राज्य संभाळता आली नाही. विकास नाही करता आला. हिंदी बोलणाऱ्या राज्यांतून लोक इकडे येतात मग हिंदी कोणासाठी शिकायचं पोरगा हिंदी चित्रपटसृष्टीत जाणार का? कोणतीही भाषा चांगलीच असते. माझा हिंदीला विरोध नाही. भाषा उभी करायला प्रचंड कष्ट असतं.

ज्याला इंग्रजी येतं त्याला लाज वाटेल इंग्रजी येतं असं अमित शाह म्हणाले. अरे तुम्हाला नाही येत.

या हिंद प्रांतावर 125 वर्ष मराठ्यांनी राज्य केलं. इतक्या राज्यांवर आम्ही राज्य केलं. आम्ही मराठी लादली? गुजरातवर, मध्य प्रदेश, पंजाबवर, अटकपर्यंत पोहोचलेलं मराठी आम्ही लादलं? 200 वर्षांपूर्वीची भाषा महाराजांच्या काळातही नव्हती. कशासाठी, कोणासाठी करायचं.

कोणाची माय व्यायली असेल त्याने...

यांनी फक्त चाचपडून पाहिलं. मुंबई स्वतंत्र करता येते का अधी थोडं भाषेला डिवचून बघू. महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू. कोणाची माय व्यायली असेल त्याने महाराष्ट्राला, मुंबईला हात घालून दाखवावं. 

मजाक वाटला काय? आम्ही शांत आहोत याचा अर्थ गां* नाही आहोत. 

काहीही अंगावर लादायचा प्रयत्न करता. आता माघार घेतली ना. आता माघार घेतली ना. मग वेगळ्या ठिकाणी वळवा प्रकरण. ठाकरेंची मुलं इंग्रजी मिडीयममध्ये शिकली मग पुढे.

मंत्रिमंडळातील मंत्र्याचं हिंदी ऐका, फेफरं येईल

दादा भुसे मराठी मिडियममध्ये शिकून शिक्षणमंत्री, फडणवीस इंग्रजीत शिकून मुख्यमंत्री झाले. कुठे काय शिकला याचा काय संबंध.

कोणाकोणाची मुलं परदेशात शिकतात याद्या आहेत आमच्याकडे. त्याचं काय करणार. त्यातल्या त्यात मंत्रिमंडळातील मंत्र्याचं हिंदी ऐका, फेफरं येईल.

तुमची पोरं कुठल्या भाषेत शिकली असेल प्रश्न महाराष्ट्रात विचारले जातात.

अजून एक गोष्ट सांगतो. आम्ही मराठी मिडियममध्ये शिकलो, आमची मुलं इंग्रजी मिडियममध्ये शिकली. यांची मुलं इंग्रजी मिडियममध्ये शिकली मग यांना मराठीचा पुळका कसा? सन्माननिय बाळासाहेब ठाकरे, माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मिडियममध्ये शिकलेले आहेत. या दोघांवर तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का? 

लालकृष्ण अडवाणी ख्रिश्चन मिशनरी शाळेत शिकले. त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का. अडणवाणी कॉनव्हेंट स्कूलमध्ये शिकलेत.

उद्या मी हिब्रू भाषेत शिकेल, मराठीचा अभिमान बाळगेन

दक्षिण भारतात तमीळ, तेलगुच्या प्रश्नावर कडवटपणे उभे राहतात. तिथे कोणी विचारत नाही तुमची मुलं कोणत्या भाषेत शिकली? उद्या मी हिब्रू भाषेत शिकेल, मराठीचा अभिमान बाळगेन काही अडचण आहे का?

दक्षिणेतले इंग्रजीत शिकलेले नेते आणि अभिनेते कोणते हे सांगतो. जय ललिता, स्टॅलिन, कन्निमोळी, उदयनिधी, चंद्रबाबू नायडू, पवन कल्याण, नारा लोकेश (एनटीआरचा नातू), कमल हसन, अभिनेता विक्रम, अभिनेता सूर्या, ए. आर. रेहमान.

रेहमान स्टेजवर असताना त्या बाई कानडीमध्ये बोलत होता. त्या बाई अचानक हिंदीत बोलू लागल्या. ए. आर. रेहमानने त्यांच्याकडे पाहिलं म्हटलं हिंदी. ए. आर. रेहमान खाली स्टेजवरुन खाली उतरले. तुमचा कडवटपणा तुम्ही शिक्षण कुठे घेतलं यावर नसतो तो आत असावा लागतो.

ते इंग्रजीत शिकले ते इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये व्यंगचित्र काढयाचे. पण मराठी अभिमानाबद्दल कधी त्यांनी तडजोड केली नाही.

एक भाषा सगळ्यांना बांधून ठेवते. कोणती भाषा?

एक भाषा सगळ्यांना बांधून ठेवते. कोणती भाषा? आजपर्यंत काय वाकडं झालं. 

आपल्या संरक्षण खात्यात जेवढ्या रेजिमंट आहे. मद्रास, राजपूत, राजपुताना रायफल्स, डोंगरा, शिख, जाट, पॅराशूट, पंजाब, मराठा इन्फेन्ट्री, गडवाल, आसाम, बिहार, महार, जम्मू-कश्मीर, गुरखा, गुरखा रायफल्स, सिक्कीम रायफल्स आहेत. शत्रू दिसला की एकत्र तुटून पडतात ना. देशात प्रांतवार रचना झाली कारण तसे भाग होते. मग या गोष्टी कशासाठी आणि का सुरु केल्या. महाराष्ट्रातील मराठी माणूस मराठी म्हणून एकत्र आला.

जातीत विभागण्याचं राजकारण

याचं पुढचं राजकारण तुम्हाला पुन्हा जातीत विभागण्यास सुरुवात करतील. पुन्हा जातीचं कार्ड खेळतील. तुम्हाला मराठी म्हणून एकत्र येऊ देणार नाहीत. जातीपातीमध्ये विभागायला सुरुवात करतील. आता सुरु केलं काल कोण्या व्यापाऱ्याच्या कानाखाली मारली मिरा-भाईंदरमध्ये. त्याच्या कपाळावर लिहिलेलं का गुजराती.

मराठी वगळता इतर चॅनेल गुजराती माणसाला मारला. बाचाबाचीत समोरचा गुजराती निघाला तर गुजराती माणसाला मारलं म्हणणार का? केवढे व्यापारी आहेत.

मारा पण व्हिडीओ काढू नका

अजून तर काहीच केलेलं नाही. त्यांना मराठी आली पाहिजे यात वाद नाही. बिनाकारण मारामारी करायची गरज नाही. जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे. पण चूक त्यांची असली पाहिजे. एका गोष्टीचं लक्षात ठेवा. अशी कधी गोष्ट कराल त्याचे व्हिडीओ काढू नका. आपल्या आपल्यातच त्यांना कळलं पाहिजे.  मरणारा सांगत नसतो. मार खाणारा सांगत असतो त्यांना सांगू द्या. अनेक गुजराती लोक आहेत. माझे नयन शाह म्हणून मित्र आहेत. त्यांना मी गुजराठी म्हणतो. अप्रतिम मराठी बोलतो. शिवाजी पार्कात फिरताना कानाला पुल देशपांडे लावून फिरणारा गुजराती आहे.

मी मगाशी सांगितलं हे मराठीचं बाळकडू आमच्यासाठी बाळकडूच होतं. 

युत्या, आघाड्या होत राहतील. महाराष्ट्र, मराठी, मराठी माणूस या विषयावर कोणत्याही परिस्थितीत तडजोड नाही. यापुढे सावध आणि सतर्क असणं गरजेचं. पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील, होतील कल्पना नाही. ही मराठीसाठीची एकजूट कायम रहावी. महाराष्ट्रात सन्माननिय बाळासाहेबांचं स्वप्न पुन्हा साकारावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि निरोप घेतो.

धन्यवाद! जय हिंद, जय महाराष्ट्र!