आनंदसरी! मान्सून अंदमानात दाखल; केरळामागोमाग महाराष्ट्रात कधी? वेळापत्रक समोर; तारखा पाहूनच घ्या...

Monsoon News 2025 : आजच्या दिवसातील उत्तम बातमी... बळीराजापासून सामान्यही सुखावणार... कारण मान्सूनची पुढील वाटचाल सुरू...   

सायली पाटील | Updated: May 14, 2025, 09:21 AM IST
आनंदसरी! मान्सून अंदमानात दाखल; केरळामागोमाग महाराष्ट्रात कधी? वेळापत्रक समोर; तारखा पाहूनच घ्या...
monsoon 2025 arrived in Andaman soon to reach kerala and then maharashtra watch latest updates

Monsoon News 2025 : फेब्रुवारीपासून राज्यात सुरू असणारी होरपळ आता काहीशी शमली असून, अवकाळीमुळं राज्याच्या कमाल तापमानात चांगलीच घट झाली आहे. मुळात अवकाळीच्या या सत्राला धरूनच आता राज्यात मान्सून दाखल होण्यासही पूरक परिस्थिती निर्माण होत असून थेट (Andaman Nicobar Monsoon) अंदमानातूनच याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. कारण मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. 

हवामान विभागाच्या माहितीनुसार अंदमानच्या समुद्रात मंगळवारी मोसमी पाऊस दाखल झाला आहे. अंदमानानंतर मान्सून बंगालच्या उपसागराचं काही क्षेत्र व्यापेल, त्यानंतर तो (Arabian Sea) अरबी समुद्राचा दक्षिण भाह, मालदीव, कोमोरिन भागापासून पुढे सरकणार आहे. 

यंदा मान्सून 8 ते 10 दिवस आधीच दाखल झाल्याने तो केरळमध्ये 25 ते 27 मेदरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे. तर 2 जूनपर्यंत पाऊस तळकोकणात दाखल होऊन  त्यानंतर कोकण मार्गानं तो राज्यभरात दाखल होण्यास सुरुवात होईल. परिणामी 6 ते 15 जूनपर्यंत राज्यात सर्वदूर पाऊस पोहोचण्याची शक्यता आहे. 

गेल्या 24 तासांपासून अंदमान आणि निकोबार बेट समूहामध्ये चांगला पाऊस सुरू असून, पुढच्या 48 तासांमध्ये हेच पर्जन्यमान इथं कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यातच बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेसह अंदमान- निकोबार बेटांच्या पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढल्यानं ही प्रणाली आणखी तीव्र होताना दिसत आहे. 

चारही महिने फक्त आणि फक्त पावसाचे...

देशाभरात यंदा जून ते सप्टेंबर या काळात सामान्य ते सरासरीपेक्षा तुलनेनं जास्त पर्जन्यमानाची शक्यता आहे. ज्यामुळं हे चार महिने फक्त आणि फक्त पावसाचेच असतील हे आता स्पष्ट होत आहे. देशाच्या वायव्य, मध्य आणि ईशान्येकडील काही भाग वगळता उर्वरित भागांमध्ये सामान्य आणि त्याहून जास्त पावसाचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

हेसुद्धा वाचा : चक्रीवादळाची चाहूल; ताशी 50-60 किमी वेगानं वारे अन् कोसळधार, राज्याच्या 'या' भागांमध्ये पाऊस थैमान घालण्याची भीती 

 

आयएमडीकडून ही माहिती मिळाली असून, यंदा देशात सामान्य पर्जन्यमान असेल. सहसा 96 ते 104 टक्क्यांच्या पटात पडणारा पाऊस सामान्य असतो. तर, याहून कमी म्हणजे 90 ते 95 टक्के पाऊस हा सरासरीच्या अगदी कमी असतो  टक्के पाऊस हा सामान्य मानला जातो. 104 ते 110 टक्के आणि त्यापलिकडे पडणारा पाऊस अधिक प्रमाणात गृहित धरला जातो. तेव्हा आता यंदाज पावसाचे हे प्राथमिक अंदाज अगदी अचूक ठरणार की जाणाऱ्या प्रत्येक दिवसानुसार त्यातही सातत्यानं बदल होणार हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असेल.