Monsoon Update: महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट! यावर्षी पाऊसमान 105 टक्के, ढगफुटीसदृश्य अन् अतिवृष्टीची शक्यता

Monsoon Update: महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान यावर्षी नेहमीच्या सरासरी पावसाच्या 105 टक्के पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.   

शिवराज यादव | Updated: May 17, 2025, 10:23 AM IST
Monsoon Update: महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट! यावर्षी पाऊसमान 105 टक्के, ढगफुटीसदृश्य अन् अतिवृष्टीची शक्यता
(File Photo)

Monsoon Update: राज्याला मान्सूनची चाहूल लागल असून, अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावण्यासही सुरुवात केली आहे. दरम्यान महाराष्ट्राला पुढील आठवड्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसंच यावर्षी नेहमीच्या सरासरी पावसाच्या 105 टक्के पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. नैऋत्य मान्सून जून ते सप्टेंबर या काळात कार्यरत असणार आहे. यंदा नेहमीच्या सरासरी पावसाच्या 105 पाऊस पडण्याची शक्यता आहे असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. केरळसह महाराष्ट्रात पावसाचं लवकर आगमन होण्याची शक्यता आहे. 

या काळात विशिष्ट कालावधीत ठराविक भागात ढगफुटी सदृश्य किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे विभागातील आपत्ती व्यवस्थापन विभागासमोर मोठे आव्हान असणार आहे. 

देशभरातील अनेक राज्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 21 आणि 22 मे रोजी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. कोकण गोवा, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे केरळ तसंच महाराष्ट्रात मान्सून नेहमीपेक्षा लवकर आगमन करण्याची शक्यता आहे. 

कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट?

पालघर आणि मुंबई वगळता कोकण विभागातील इतर जिल्ह्यांना मंगळवारपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांनाही पुढील 4 दिवस यल्लो अलर्ट आहे. मराठवड्यातही सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहू शकतात.