MSEDCL Electricity Connection: मुंबई उपनगरातील हजारो ग्राहकांचं वीज कनेक्शन कापण्यात आलं आहे. महावितरणच्या कल्याण आणि भांडुप परिमंडलात वीजबिल थकबाकीदारांचा वीजपरवठा खंडित करण्याची मोहिम अधिक तीव्र करण्यात आली आहे. मार्च महिन्यात आत्तापर्यंत या दोन्ही परिमंडलातील 10 हजार 177 थकबाकीदार लघुदाब ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडित करण्यात आला आहे. मार्च अखेरला अवघे कांही तास उरलेले असताना कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत वीजबिले तत्काळ भरावीत, असे आवाहन महावितरणने केले आहे.
ग्राहकांकडील वीजबिलांच्या दरमहा वसुलीवरच महावितरणची संपूर्ण आर्थिक मदार आहे. त्यामुळे थकीत वीजबिलांच्या वसुलीला वेग देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. कल्याण परिमंडलात मार्चमध्ये आत्तापर्यंत 5 हजार 564 थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यात कल्याण मंडल एक अंतर्गत 1 हजार 252, कल्याण मंडल दोन अंतर्गत 1 हजार 700, वसई मंडलात 2 हजार 402 आणि पालघर मंडलात 210 ग्राहकांचा समावेश आहे. मार्च अखेरपर्यंत कल्याण परिमंडलातील विविध वर्गवारीतील लघुदाब ग्राहकांकडून 53 कोटी 4 लाख रुपयांची वीजबिल थकबाकी वसुल होणे अजून बाकी आहे.
भांडुप परिमंडलात मार्चमध्ये आत्तापर्यंत 4 हजार 613 थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यात ठाणे शहर मंडल अंतर्गत 1 हजार 298, वाशी मंडल अंतर्गत 1 हजार 779, आणि पेण मंडलात 1 हजार 536 ग्राहकांचा समावेश आहे. 31 मार्चपर्यंत भांडुप परिमंडलातील विविध वर्गवारीतील लघुदाब ग्राहकांकडून 75 कोटी 96 लाख रुपयांची वीजबिल थकबाकी वसुल करण्याचे आव्हान आहे.
नक्की वाचा >> लोकच कुणाल कामराच्या खात्यावर पाठवतायेत पैसे! 2 दिवसात जमले 4 कोटी 7 लाख रुपये, कारण...
कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांना केवळ मूळ थकबाकीच्या रकमेचा एकरकमी किंवा सहा हप्त्यांत भरणा करून थकबाकीमुक्ती व पुनर्वीजजोडणीची संधी देणाऱ्या अभय योजनेला आता केवळ पाच दिवस उरले आहेत. येत्या 31 मार्चला या योजनेची मुदत संपत आहे. दोन्ही परिमंडलामध्ये आतापर्यंत 16 हजार 500 ग्राहकांनी जवळपास 35 कोटी 50 लाख रुपयांचा भरणा करून थकबाकीमुक्ती मिळवली आहे. उर्वरित थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. त्यामुळेच थकित वीज देयक असलेल्या ग्राहकांच्या यादीत तुमचं नाव तर नाही ना? किंवा तुमचं वीज देयक थकित असेल तर ते तातडीने भरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.