)
जून महिन्याच्या सुरुवात झाली आहे आता सगळ्यांना वेध लागलेत ते पावसाचे. पावसामध्ये रस्त्यांची दुरावस्था पाहायला मिळते. या सगळ्यात मुंबई-गोवा महामार्ग अग्रस्थानी असणार आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी मुंबई-गोवा महामार्गाचे काम 31 मे अखेर पूर्ण होईल,अशी ग्वाही कोकणवासीयांना दिली होती. पण 31 मे उलटून जून सुरू झाला तरी महामार्गाचे उर्वरित काम मार्गी लागलेले नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात कोकणवासीयांचा प्रवास काही प्रमाणात गैरसोयीचाच ठरणार आहे.
2011 मध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला सुरुवात झाली. हे काम 2014 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र 2026 उजाडले तरी काम पूर्ण होऊ शकलेले नाही. दरवर्षी मे अखेर किंवा डिसेंबरअखेर काम पूर्ण होईल, अशी आश्वासने दिली जातात. मात्र काम काही पूर्ण होत नाही. न्यायालयातही दाखल याचिकांवर सुनावणी दरम्यान महामार्ग विभागाने या रस्त्याच्या कामा संदर्भात अनेक लेखी हमीपत्रे दिली.
संसद आणि विधिमंडळाच्या अधिवेशनातही आश्वासने मिळाली. मात्र पूर्ण काम झालेले नाही. खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात मंत्री गडकरी यांनी दीर्घकाळ रखडलेल्या या महामार्गाचे काम 31 मेअखेर पूर्ण होईल, असे सांगितले होते.
चिपळूण पूल, संगमेश्वर पूल, निवळी पूल, पाली पूल आणि लांजा येथील पुलाचे काम अपूर्णच असल्यामुळे नागरिकांची गैरसोय निश्वित आहे. सिंधुदुर्गातील त्या कार्यक्रमानंतर अनेक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी महामार्गाच्या कामाची पाहणी करून "आम्ही वेळेत काम पूर्ण करू" अशा घोषणा केल्या होत्या. मात्र, ठेकेदारांनी आपल्या कामाची गती काही वाढवलेली दिसत नाही.
खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याला केंद्राचे वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, दिर्घकाळ रखडलेला मुंबई गोवा महामार्गाचे काम 31 मे अखेर पर्यंत पूर्ण होईल. या महामार्गावरुन माझ्यावर अनेकदा टिका झाली त्यामुळे ती उद्घाटनालाही येणार नाही.