Mumbai Metro 8 Update: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबई मेट्रो आता थेट शहरातील महत्त्वाच्या टर्मिनसला जोडण्यात येणार आहे.‘मेट्रो 8’ आता लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत धावणार आहे.मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो 8 मार्गिकेचा आराखडा अखेर पूर्ण झाला आहे. लवकरच सिडकोकडून याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.
‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळ-नवी मुंबई विमानतळ मेट्रो 8’ मार्गिकेचा आराखडा अखेर सिकडोने तयार केला असून हा आराखडा लवकरच राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. सिडकोने मूळ आराखड्यात काहीसा बदल करून ही मार्गिका आता दोन विमानतळांबरोबरच मुंबईतील महत्त्वाच्या अशा लोकमान्य टिळक टर्मिनसशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीच आराखड्यात लोकमान्य टिळक टर्मिनस मेट्रो स्थानक समाविष्ट करण्यात आले आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सध्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसाठी मोठ्या संख्येने गाड्या सुटत नाहीत. टर्मिनस मेट्रोने जोडल्यास भविष्यात येथून महाराष्ट्राच्या इतर भागासाठी सोडण्यात येणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) 337 किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील ‘मेट्रो ८’ मार्गिकेची उभारणी एमएमआरडीए आणि सिडको संयुक्तपणे करणार होते. मात्र नगर विकास विभागाने 27 जानेवारी 2025 रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध करून या मार्गिकेची सार्वजनिक-खासगी सहभागातून उभारणी करण्याचा निर्णय घेतला. तसेच आराखड्यासह निविदा प्रक्रिया राबवून प्रकल्पाची उभारणी करण्याची जबाबदारी सिडकोवर सोपविण्यात आली. त्यानुसार ‘मेट्रो 8’चा सुधारित आराखडा नुकताच सिडकोने तयार केल्याची माहिती सिडकोतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबई विमानतळ ते मानखुर्द अशी 11.1 किमी लांबीची मेट्रो लाइन 8 बांधण्यात येणार आहे. तर, सिडको मानखुर्द ते नवी मुंबई विमानतळ या मार्गाचा विस्तार करणार आहे. तसंच, हा मार्ग भुयारी असणार आहे. घाटकोपर येथील अंधेरी ते इस्टर्न एक्स्प्रेस हायवेपर्यंत हा भुयारी मार्ग असणार आहे. घाटकोपर ते मानखुर्द हा लिंक रोडने उन्नत करण्यात येणार आहे.