मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर वाहतूक कोंडी झाली असतानाच नवं विघ्न, आणखी एक मोठा अपघात

Mumbai Pune Express Way : गेल्या 24 तासाहून अधिक काळ मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवरील मुंबईला येणारी वाहतूक खोळंबली आहे. गॅस टँकरच्या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली असताना यामध्ये आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. आता पुण्याकडे जाणाऱ्या वाहतूकीला जबर फटका बसण्याची शक्यता आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 4, 2026, 11:06 PM IST
मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर वाहतूक कोंडी झाली असतानाच नवं विघ्न, आणखी एक मोठा अपघात

Mumbai Pune Express Way Traffic Jam : मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर गेल्या 24 तासांत दुसरा मोठा अपघात झाला आहे. मंगळवारी सायंकाळी आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर उलटल्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक आधीच ठप्प झाली होती. असं असताना आता आलेल्या बातमीनुसार पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीचाही खोळंबा होणार आहे. पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर (Pune-Mumbai Expressway) खडकाळे गावाजवळ आणि टोनी धाब्यापाशी (Toni Daa Dhaba) 4 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला हा दुसरा मोठा अपघात आहे. 

Add Zee News as a Preferred Source

एका पेट्रोल टँकरला कंटेनरने जोरात धडक दिली. हा अपघात खडकाळे गावाच्या हद्दीत, टोनी धाब्याजवळ झाला आहे. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या वाहतूकीचा खोळंबा झाला आहे. या अपघातामुळे पुण्याकडे येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

काल रात्रीपासून आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर उलटल्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक आधीच ठप्प होती. आता पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर हा दुसरा अपघात झाल्याने दोन्ही बाजूने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
महामार्ग पोलिसांनी प्रवाशांना शक्य असल्यास प्रवास टाळण्याचे किंवा जुन्या पुणे-मुंबई महामार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रवासी तामिणी घाट किंवा माळशेज घाट मार्गाचा वापर करू शकतात. रेल्वे सेवा सध्या सुरळीत असून प्रवाशांनी रेल्वेने प्रवास करण्यास प्राधान्य द्यावे. 

गेल्या 24 तासांतील महत्त्वाच्या घडामोडी 

  1. अदोशी बोगद्याजवळ गॅस टँकर उलटला: खंडाळा घाटात ज्वलनशील प्रोपिलीन गॅस घेऊन जाणारा टँकर उलटल्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर 24 तासांपेक्षा जास्त काळ वाहतूक ठप्प झाली. प्रवाशांना अन्न, पाणी आणि शौचालयाच्या सुविधा न मिळाल्याने त्रास झाला. 
  2. प्रवाशांना तासन् तास त्रास: रात्रीभर वाहतूक कोंडीमुळे हजारो प्रवासी अडकले, ज्यात महिला आणि मुलांचा समावेश आहे. एक्सप्रेसवे 'पार्किंग लॉट' सारखा झाला असल्याचे प्रवाशांनी सांगितले. 
  3. जुन्या महामार्गावर ट्रॅफिक वळवली: एक्सप्रेसवेवरील सर्व वाहने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळवण्यात आली, परंतु तेथेही ओव्हरलोडमुळे कोंडी कायम आहे. घाटातील वाहतूक अजूनही ठप्प आहे. 
  4. 22 तास उलटूनही विस्कळीत वाहतूक: सकाळीही मुंबई-पुणे एक्सप्रेसवे पूर्णपणे बंद आहे, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. 
  5. पर्यायी मार्गांचा सल्ला: अधिकाऱ्यांनी ताम्हिणी घाट किंवा माळशेज घाटासारखे पर्यायी मार्ग वापरण्याचा सल्ला दिला आहे, कारण 50  किमी लांब कोंडीमुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प आहे. 
About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More