Mumbai Pune Expressway Traffic: 22 KM पर्यंत वाहनांच्या रांगा... पोलिसांनी सुचवले 3 पर्यायी मार्ग

Mumbai Pune Expressway Traffic: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मंगळवारी झालेल्या अपघातानंतर वाहतुककोंडी झाली असून त्याचा मोठा परिणाम दिसत आहे. 20 तासांहून अधिक वेळ हा मार्ग ठप्प असून लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 4, 2026, 03:12 PM IST
Mumbai Pune Expressway Traffic: 22 KM पर्यंत वाहनांच्या रांगा... पोलिसांनी सुचवले 3 पर्यायी मार्ग
20 तासांपासून वाहनं अडकून (फाइल फोटो)

Mumbai Pune Expressway Traffic: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मंगळवारी झालेल्या एका भीषण अपघाताला 20 तास उलटून गेल्यानंतरही या मार्गावरील वाहतुककोंडी सुटलेली नाही. मंगळवारी संध्याकाळी सुमारे पाच वाजता खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील प्रोपेलिन गॅस वाहून नेणारा टँकर उलटला. टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला. गॅस गळती वाढल्याने काही काळ दोन्ही दिशांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आणि वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. हा टँकर तासाभरात हटवला जाईल सांगण्यात आलेलं. मात्र गॅस गळती सुरुच असल्याने 20 तासानंतरही या मार्गावरील वाहतूक सुरळीत झालेली नाही. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर तर 20 ते 22 किलोमीटर दूर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. हा टँकर बोगद्याच्या तोंडाजवळच उलटला आहे. हा टँकर बोगद्यात उलटला असता तर मोठी दुर्घटना घडली असती.

Add Zee News as a Preferred Source

20 ते 22 किलोमीटरपर्यंत लांबपर्यंत वाहनांच्या रांगा

अपघातानंतर 20 तासांहून अधिक काळापासून या महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली आहे. 20 ते 22 किलोमीटरपर्यंत लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून, हजारो प्रवासी अडकून पडले आहेत. प्रवाशांना, ट्रक चालकांना अन्न, पाणी आणि शौचालयाच्या सुविधा उपलब्ध नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. मुंबईकडे जाणारी मार्गिका बंद असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. 

मध्यरात्रीनंतर एका लेनवरून हळूहळू वाहतूक सुरू करण्यात आली, पण अद्याप वाहतूक पूर्णपणे सुरळीत झालेली नाही.  लोणावळा आणि खोपोली शहरांजवळही कोंडी असून, गुगल मॅपवर हा मार्ग ब्लॉक असल्याच दाखवलं जात आहे. हा मार्ग नेमका कधीपर्यंत पूर्वव्रत होईल हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

पर्यायी मार्ग कोणते

महाराष्ट्रात सर्वाधिक वापरला जाणारा मुंबई-पुणे एक्सप्रेस वे बंद असल्याने मालवाहतुक आणि प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. महामार्ग सुरक्षा पथक आणि पोलिसांनी मुंबई-पुणे मार्गाने प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. अगदीच आवश्यकता असल्यास इतर मार्ग निवडावेत असं सांगण्यात आलं आहे. पर्यायी मार्ग कोणते असू शकतील हे ही सांगितलं आहे. खालील पर्यायी मार्गांचा वापरा करता येईल. 

माळशेज घाट मार्ग: मुंबईहून पुण्याकडे जाण्यासाठी माळशेज घाटाचा पर्याय वापरता येईल.
जुना मुंबई-पुणे महामार्ग: लोणावळा-खोपोली भागातून जाणारा जुना रस्ताही वापरता येईल.
ताम्हिणी घाट मार्ग: पुण्याहून मुंबईकडे जाण्यासाठी ताम्हिणी घाट वापरावा असा सल्ला देण्यात आला आहे.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More