मुंबईसह ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! सलग 5 दिवस 10 टक्के पाणीकपात, 'या' परिसरांना फटका बसणार

Mumbai Water Cut News Today Live: मुंबईकरांच्या कामाची बातमी समोर येत आहे. पिसे येथील 'न्यूमॅटिक गेट सिस्टीम' मध्ये बिघाड झाल्याने मुंबई शहर व उपनगरासह ठाणे, भिवंडीतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 1, 2024, 09:41 AM IST
मुंबईसह ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! सलग 5 दिवस 10 टक्के पाणीकपात, 'या' परिसरांना फटका बसणार title=
Mumbai Thane and other areas to receive less water from today

Mumbai Water Cut News Today Live: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आजपासून 5 डिसेंबर या कालावधीत पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात करण्यात येणार आहे. त्यामुळं नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे अवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. 

मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड झाला असून, त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. १ आणि २ डिसेंबरदरम्यान हे काम होणार आहे; मात्र या कामामुळे मुंबई शहर व उपनगरांसह ठाणे व भिवंडी महापालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १ ते ५ डिसेंबर या कालावधीत १० टक्के कपात करण्यात येणार आहे.

पिसे येथून ठाणे आणि भिवंडीलाही पाणीपुरवठा होतो. ठाणे आणि भिवंडी येथून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या
जलवाहिन्या मुंबईपर्यंत येतात. त्यामुळे या दोन्ही शहरांना पाणीपुरवठ्यातील काही वाटा दिला जातो. दुरुस्तीच्या कामामुळे साहजिकच या दोन्ही शहरांच्या पाणीपुरवठ्यावरही परिणाम होणार आहे. दुरुस्तीचे काम दोन दिवस चालणार असले तरी पाणीपुरवठ्यात मात्र पाच दिवस कपात असेल. दोनच दिवसांपूर्वी लोअर परळ येथील तानसा जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे शहर भागातील अनेक विभागात पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता. त्यानंतर आता पिसे येथे बिघाड निर्माण झाला आहे.

पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या या १०० वर्षांपेक्षा जुन्या आहेत. त्यामुळे वारंवार बिघाड होऊन दुरुस्तीची कामे हाती घ्यावी लागतात. ही समस्या कायमची दूर करण्यासाठी पालिकेने जल बोगद्याचे प्रकल्प हाती घेतले असून काही ठिकाणची कामे पूर्णही झाली आहेत. बोगद्यामुळे पाणी गळती आणि पाणी चोरी थांबते. बोगदे हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बांधल्याने त्यांचे आयुर्मानही जास्त असते. बोगद्याच्या पृष्ठभागावर विशिष्ट रसायनाचे अस्तर असल्याने ते गंजण्याची शक्यता कमी असते.

दुरुस्ती कामामुळे मुंबई शहर व उपनगरांसह बृहन्मुंबई महानगरपालिके मार्फत ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. या कालावधीत पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात करण्यात येणार आहे.