मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर मोठा निर्णय! जानेवारी 2026 पासून नव्या ट्रेन सेवेत येणार; अशी असेल नवी ट्रेन

Mumbra Train Mishap: मुंब्रामध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जानेवारी 2026 पासून नव्या ट्रेन सेवेत येणार आहेत.   

शिवराज यादव | Updated: Jun 9, 2025, 08:24 PM IST
मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर मोठा निर्णय! जानेवारी 2026 पासून नव्या ट्रेन सेवेत येणार; अशी असेल नवी ट्रेन

Mumbra Train Mishap: मुंब्रामध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. दुर्घटनेवर आयसीएफ बैठकीत रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. त्यानुसार लोकलचं सर्व रुपडंच बदललं जाणार आहे. नव्या ट्रेन नोव्हेंबर 2025 पर्यंत तयार होणार आहेत. तसंच जानेवारी 2026 पासून या नव्या ट्रेन सेवेत येतील. मुंबईमधील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या दुर्घटनेत 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

नेमकं काय झालं?

मुंब्रा-दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान दोन लोकलमधील प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागल्याने खाली ट्रॅकवर पडले. या दुर्घटनेत 4 प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघातातील 10 जणांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केलं आहे. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच एकाचा मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या दोघांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले आहे. सात जखमी रुग्णांवरील धोका टळला असून या अपघातात आतापर्यंत एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. 

कशी असेल नवी रेल्वे?

मुंब्रा रेल्वे अपघातानंतर रेल्वेला जाग आली आहे. आयसीएफ बैठकीत रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांची चर्चा झाली असून, नॉन-एसी लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजांचा उपाय काढण्यात आला आहे. वेंटीलेशनसाठी फ्लॅप लावणार असल्याची माहिती आहे. तसंच छपराकडेही वेंटीलेशन युनिट लावलं जाणार आहे. कोटमध्येही वेस्टिब्युल लावणार असून, एका कोचमधून दुसऱ्या कोचमध्ये जाण्याची सोय केली जाईल. नव्या ट्रेन नोव्हेंबर 2025 पर्यंत तयार होणार आणि जानेवारी 2026 पासून सेवेत येणार.