Nagpur Bulldozer Pattern: नागपूर घटनेतील आरोपीचं घर आज पाडण्यात आलंय. आरोपी फहीम खान, शमीम खानच्या संजयबाग कॉलनीतील घरात त्याने अनधिकृत बांधकाम केल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे मनपा प्रशासनाने त्याला नोटीस बजावली होती. यानंतर अनधिकृत बांधकाम बुलडोझरने आज पाडण्यात आलंय.
फहीम खानविरोधात देशद्रोहाचादेखील गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या तो कोठडीत आहे. फहीम खानबाबत पोलिसांकडून चौकशी करण्यात येत असताना त्याच्या घरात बांधकाम अनधिकृत असल्याची बाब समोर आली. त्यामुळे त्याच्या दोन मजली घराबाबत महानगरपालिकेने त्याला तत्काळ नोटीस बजावलीय.
24 तासांच्या नागरी मुदतीत कथित बेकायदेशीर बांधकाम हटवलं नाही तर बुलडोझरने कारवाई केली जाणार अशी नोटीस देण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायद्याने परवानगी दिली तर बुलडोझर चालवले जातील असं वक्तव्य केल्यानंतर दोन दिवसांनी ही कारवाई करण्यात येतेय.
नागपूर हिंसाचार प्रकरणातील 19 आरोपींना न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयाने (जेएमएफसी) 24 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 21 आरोपींना एमसीआर (मॅजिस्ट्रेयल कस्टडी रिमांड) 24 मार्चपर्यंत रिमांड दिला आहे.